महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चिमूर तालुक्यात रेती तस्करी-चिमूर तालुका काँग्रेस कमेटीचा आरोप

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर

रेती तस्करी रोखण्यासाठी समिती गठीत करण्याचे प्रशासनाला निवेदन

 

तालुक्यातील चिमूर, नेरी, मासळ,मदनापूर, खडसंगी, मोटेगाव, भिसी परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी वाढली आहे. ही रेती तस्करी स्थानिक महसूल विभागात कार्यरत कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे वाढली आहे, असा आरोप चिमूर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विजय गावंडे यांनी चिमूर उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांना बुधवार, 9 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता दिलेल्या निवेदनातून केली आहे. महसूल विभाग सक्षम नसेल तर रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक समिती गठीत करण्याची मागणी गावंडे यांनी प्रशासनाला केली आहे.

महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेती तस्करीवर आळा घालण्याचे ठरवले तर ही तस्करी थांबू शकते. पण रेती तस्करी महसूल विभागाच्या संगणमताने होत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे, तो शासनाला परत मिळू शकतो, ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, माजी जि. प. सदस्य विलास डांगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. राम राऊत, चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे व अन्य नेते उपस्थित होते.