विहिरगाव शिवारातील पूरस्थिती व अतिवृष्टीच्या सर्वेक्षणमध्ये घोळ…फेर सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मंजूर करण्याची गावकऱ्यांची मागणी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर  

दि.२५/११/२०२२

राजुरा 

पावसाळ्याच्या जुलै ते सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे वर्धा नदीला चार वेळा पुर आला.या पुराच्या पाण्यामुळे विहिरगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले आहे.पण पूरस्थिती व अतिवृष्टीच्या सर्व्हे मध्ये घोळ केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.प्रत्येकक्षात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मदत मिळाली आहे.याउलट कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मात्र भरघोस नुकसान भरपाई देण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शेतीचे फेर सर्वेक्षण करून वाढीव नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी गावकऱ्यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातुन केली आहे.. …जुलै ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने वर्धा नदीला चार वेळा पूर आला.याच पुराच्या पाण्यामुळे उभे पीक नेस्तनाबूत झाले.तसेच संततधार पावसामुळे शेत पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याच पुरामुळे जमिनी खरवडून गेल्या आहे.या नुकसानीचा सर्व्हे करण्यात आला आहे. पण प्रत्यक्ष मोक्यावर सर्व्हे न करता मर्जीनुसार काही शेतकऱ्यांचे नाव समाविष्ठ करण्यात आल्याने यादी भेदभावपूर्ण तयार करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.त्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करतांना काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे अशी ओरड सुरू आहे. ….या संदर्भात विहिरगाव शिवारातील ८० शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधितांवर कारवाई करण्यासोबतच फेर सर्वेक्षण करून वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी सुध्दा गावकऱ्यांनी निवेदनातुन केली आहे.