संविधान म्हणजे रयतेचे राज्य – बबिता गेडेकर

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

सावली , दि. ७/१२/२०२२

महामानव डॉ. बाबासाहेबानी लिहिलेले संविधान म्हणजे रयतेचे राज्य आहे. संविधानामुळेच समानतेची स्त्रियांना वागणूक मिळत असल्याचे प्रतिपादन महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी विहीरगाव येथील शिक्षिका बबिता गेडेकर यांनी केले. रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ज्ञानाच्या अथांग महासागरास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली येथील माजी गटशिक्षणाधिकारी तुलाराम राऊत, संस्थेचे अध्यक्ष के. एन. बोरकर, संस्था सचिव व्ही. सी. गेडाम, संचालक चंद्रभागा गेडाम, भाऊराव गोवर्धन, वसंत बोरकर, माजी प्राचार्य भैसारे, हिरालाल दुधे, पालक संघाचे उपाध्यक्ष आशिष दुधे, अंजली देवगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधानाद्वारे बाबासाहेबांनी समस्त भारतीयांचा उद्धार केला अठरा अठरा तास अभ्यास करून बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिले. त्यात सर्वांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते. परंतु बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे स्त्रियांना अधिकार प्राप्त झाले असून समानतेची वागणूक मिळत आहे. बाबासाहेबांचे उपकार स्त्रियांनी कधीही विसरता कामा नये. असे बबीता गडेकर यांनी आदरांजली कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.

इयत्ता आठवीची विद्यार्थिनी वैष्णवी मडावी हिने बाबासाहेबांच्या जीवनावरील भाषणाने सर्वांना आकर्षित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य शेंडे, सूत्रसंचालन पंडित फुलझेले तर आभार प्रदर्शन लाकडे यांनी केले.