एम्टा खाणीमधून कोळसा चोरीचा प्रयत्न,२ आरोपींना वाहनासह अटक

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

भद्रावती,/दि.९१२/२०२२

कर्नाटका एम्टा खाणीमधून कोळसा चोरी करत असतांना चोरट्यांना एम्टाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून वाहनासह रंगेहात पकडण्यात आले. यातील २ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून सापडलेल्या दोन आरोपींना एम्टाच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

कर्नाटका एम्टा येथील सुरक्षा अधिकारी पंजाबराव परघने हे शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास सुरक्षा एजन्सीचे संचालक इम्रान खान व चेतन स्वान यांच्यासमवेत सुरक्षा एजन्सीच्या वाहनाने खदानीमध्ये गस्तीवर असतांना टाटा एस मालवाहू गाडी क्र. एमएच ३४ बीजी ७४४० या गाडीमध्ये काही इसम खदानीच्या कोळसा स्टॉक मधून कोळसा चोरून जुन्या महामार्गाने भद्रावतीकडे जात असल्याबाबत माहिती मिळाली. यावरून सदर वाहनाच्या शोधात निघाले असतांना जुन्या महामार्गावर सदर वाहन दिसले. वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील दोन व्यक्ती पळून गेले. मात्र गाडीचा चालक व गाडीत बसलेला एक व्यक्ती सापडले. गाडीची तपासणी केली असता यामध्ये अंदाजे १८००० रूपये किंमतीचा १५ क्विंटल दगडी कोळसा सापडला. यापैकी वाहनचालकाचे नाव समीक्ष संजय बारेकर रा. फुकटनगर भद्रावती व दुसऱ्याचे नाव महेश खुशाल गलांडे रा. शिवाजीनगर भद्रावती आहे. तर पळून गेलेल्या ईसमांची नावे आशीष मडावी रा. शिवाजीनगर भद्रावती व रितीक कांबळे रा. सुरक्षानगर भद्रावती अशी आहेत. यानुसार घटनेची तक्रार भद्रावती पोलिसांकडे करण्यात आली आहे.