आदर्श महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

श्री विलास ढोरे , वडसा तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर 
ग्रामीण विद्यार्थ्यांनी क्षमतेचा नियोजन बद्ध उपयोग केल्यास स्पर्धा परीक्षेत यश निश्चित – दिनेश देशमुख
देसाईगंज:- “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमता अपार आहेत परंतु स्पर्धा परीक्षेबाबत अनास्था, अनावश्यक भीती व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची हिंमत करीत नाही. भयमूक्त होऊन नियोजन बद्ध अभ्यासाला सुरवात केल्यास स्पर्धा परिक्षेत यश निश्चित आहे. असे मोलाचे मार्गदर्शन ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र कुरखेडाचे संचालक दिनेश देशमुख यांनी केले. ते स्थानिक आदर्श महाविद्यालयात, रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभाग आणि ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवशीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. जे. पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठी विभाग प्रमुख प्रा. रमेश धोटे व रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभाग प्रभारी प्रा. निहार बोदेले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. जे. पी. देशमुख म्हणाले की, “स्पर्धा परीक्षेतील यश हे नियोजन आणि अभ्यासक्रमावर अवलंबून जरी असले तरी यामध्ये विद्यार्थ्यांचे मनोबल आणि सकारात्मक वृत्ती यामुळेच प्रत्येकाला परीक्षेत यश प्राप्त करता येते. म्हणूनच स्पर्धा परीक्षेत नियोजन पूर्व तयारी, उच्च मनोबल आणि सकारात्मक प्रवृत्ती सदैव बाळगणे आवश्यक आहे.” प्रमुख अतिथी स्थानावरून प्रा. रमेश धोटे यांनी सुद्धा उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून विभागाचे प्रभारी प्रा निहार बोदेले यांनी कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा व अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे म्हणून महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असते अशी भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन कु. चेतना कोरे, बी. कॉम. 3 हिने केले. तर उपस्थितांचे आभार कु.पुनम राऊत, बी.कॉम. भाग 3 हिने मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वृंद उपस्थित होते.