गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
गडचिरोली, दि.१६: सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावी तसेच सर्व प्रलंबित संदर्भ/अर्ज/तक्रारी यांचा निपटारा मोहीम स्वरूपात करणेकरिता दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे.सेवा पंधरवड्यात आपले सरकार वेब पोर्टल,महवितरण पोर्टल, डीबिटी पोर्टल, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा तसेच सर्व विभागाच्या स्वतःच्या योजनाशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज याविषयी निपटारा करण्यात येणार आहे.
सेवा पंधरवड्यात प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेल्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग,आदिवासी विकास विभाग,सार्वजनिक आरोग्य विभाग,ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागाकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेत निपटारा करण्यात येणार आहे. तसेच दिनांक २१/०९/२०२२ रोजी तहसील कार्यालय गडचिरोली तर्फे गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.
तरी सर्व नागरिकांनी सदर सेवा पंधरवड्यात देण्यात येणाऱ्या सेवांचा व महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा असे तहसील कार्यालय गडचिरोली तर्फे आवाहन करण्यात येत आहे.