श्री.श्याम यादव कोरची प्रतिनिधी,न्यूज जागर
कोरची भिमपुर हा मार्ग राज्य मार्ग असून सदर मार्ग हे छत्तीसगडला जोडले गेले असल्यामुळे या मार्गावर नेहमी हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते. मागील कित्येक दिवसांपासून या मार्गावर मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले असून नागरिकांना मार्गक्रमण करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. निर्माण झालेल्या या खड्ड्यांमुळे कित्येक अपघात सुद्धा घडत असून यामुळे काही लोकांनी आपला जीव सुद्धा गमविला आहे. या खड्ड्यांमुळे महागड्या गाड्या सुद्धा नादुरुस्त होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरची हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शासकीय कामाकरिता व बाजारपेठेत खरेदी करिता परिसरातील नागरिकांना या मार्गाने ये जा करण्यास खूप त्रास सहन करावे लागत असून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा आपले शिक्षण घेण्यास खूप अडचणीच्या सामना करावा लागत आहे. दरवर्षी या रस्त्यावर देखभाल दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपये खर्च केले जाते परंतु परिस्थिती अजूनही गंभीर होत असल्यामुळे नागरिकांनी या मार्गाने ये जा करावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सदर रस्त्याचे काम पंधरा दिवसाचे आत सुरू करावे व विहित मुदतीत काम पूर्ण करावे जेणेकरून नागरिकांना त्रास होता कामा नये अन्यथा कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक जनतेसोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनातून तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आलेला आहे.
यावेळी निवेदन देताना कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल, नगरपंचायत नगराध्यक्ष सौ हर्षलता भैसारे, रामसुराम काटेंगे माजी जिल्हा परिषद सदस्य, मेहेरसिंग काटेंगे ग्रामपंचायत सदस्य नवरगाव, वीरेंद्र मडावी ग्रामपंचायत सदस्य नवरगाव, लीलाराम अहराज सामाजिक कार्यकर्ता, रुखमन घाटघुमर काँग्रेस कार्यकर्ता, वशिम शेख तालुका अध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया, किशोर नरोटे सरपंच ग्रामपंचायत बिहिटेकला, भगवती सोनार महिला व बालकल्याण सभापती, मोहन कुमरे सरपंच ग्रामपंचायत जांभळी आदी उपस्थित होते.