श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज
आमदार गजबेंच्या मागणीची महामंडळाच्या महाव्यवस्थापक भीलारकर यांनी घेतली दखल
देसाईगंज शहरातील मागील चार वर्षापासून रखडलेल्या बांधकामाचा मुद्दा वारंवार उठत असल्याचे लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक भीलारकर यांचे थेट कार्यालय गाठुन याबाबत विचारणा केली असता भीलाकर यांनी या गंभीर बाबीची दखल घेत तत्काळ चौकशी करून येत्या आठवडाभरात बसस्थानकाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया राबवून रखडलेल्या बांधकामाची समस्या मार्गी लावण्याची हमी आमदार गजबेंना दिली असल्याने एकुणच बसस्थानकाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलल्या जाऊ लागले.
शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील प्रगत शहर म्हणून नावलौकिक असलेल्या देसाईगंज शहराच्या बसस्थानकाचा प्रश्न आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी अथक परिश्रमाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कार्यकाळात स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह २०१८ मध्येच बांधकामासाठी अत्यावश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा करुन घेतला होता.
त्या अनुषंगाने बसस्थानकाच्या जागेचा ताबा घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली येथील विभाग नियंत्रण यांच्याकडून पारीत आदेशातील रक्कम शासन खजीना दाखल करण्याच्या प्राप्त सुचनेनुसार देसाईगंज येथील नझुल खसरा क्रमांक २४५ मधील खुल्या खंडकापैकी क्षेञ ६१२० चौ. मी.जमिनीची अनुज्ञेय रक्कम १ कोटी २४ लाख २३ हजार रुपये ३ नोव्हेंबर २०१८ अन्वये शासन खजिन्यात जमा केली होती.
दरम्यान निवडणूक आचार संहिता व कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे व निधीच्या कमतरतेमुळे मंजुर असलेल्या निविदेला कार्यारंभ आदेश देण्यात आले नाही. दरम्यान सन २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात ८ मार्च २०२१ रोजी तारांकित प्रश्न क्रमांक २३८३५ नुसार आमदार गजबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निधी अभावी बसस्थानकाचे बांधकाम सुरू न होऊ शकल्याचे मान्य करुन लवकरच निधी उपलब्ध करून देऊन बांधकाम सुरु करण्याचे आश्वासन तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी दिले होते.
तथापी आश्वासनांची पुर्तता करण्यात न आल्याने प्रवाशांची होऊ लागलेली गैरसोय पाहु जाता मुंबई येथे २७ डिसेंबर २०२१ पार पडलेल्या अधिवेशनात परत आमदार गजबे यांनी प्रश्न उपस्थित केला असता तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. माञ याही कालावधिस जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटत चालला तरी अद्यापही शासन स्तरावरुन कुठल्याच हालचाली दिसुन येत नसल्याचे पाहु जाता आमदार गजबे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक भीलारकर यांचे थेट कार्यालय गाठुन याबाबत विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात तत्काळ चौकशी करून येत्या आठवडाभरात बसस्थानकाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची हमी दिली. तसे निर्देशही तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याने एकुणच येथील बसस्थानकाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे यामुळे बोलल्या जाऊ लागले आहे.