ठाणेदाराविरुद्ध 324 चा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

बनावट कागदपत्रे सादर करून शेतीसाठी कर्ज घेणाऱ्या आरोपीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने जिवती तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शहाजी घोडके यांच्यावर भारतीय दंडविधान कलम ३२४ अन्वये  गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाटण शाखेत १४ शेतकऱ्यांनी बनावट सातबारा व इतर कागदपत्रे दाखवून १३ लाख ७८ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी त्यांनी बनावट शिक्के वापरून सातबारा, आठ अ चेंज रजिस्टर अशी बनावट कागदपत्रे बनवून बँकेची फसवणूक केली.

बँकेने ही कागदपत्रे पुन्हा तपासली असता ती बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे बँकेने पाटण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटण पोलिसांनी १४ शेतकऱ्यांविरुद्ध कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पण या दरम्यान पोलिस उपनिरीक्षक शहाजी घोडके यांनी आरोपी मारोती बोंबीलवार यांना पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाला मारहाणी बाब लक्षात येताच गोपनीय वैद्यकीय अहवाल मागविला. अहवालात बेदम मारहाण केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने ठाणेदाराविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.