जिल्ह्यातील कृषी पंपाना १२ तास सुरळीत विज पुरवठा सुरु – आमदार कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्यास यश

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज, दि. ३/१२/२०२२ 

आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे मानले आभार

अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचना संदर्भात अडचण लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातुन जिल्ह्यात कृषी पंपाना सुरळीत विज पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने दिलेल्या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या संदर्भात तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना १२ तास सुरळीत विज पुरवठा करण्याचे निर्देश देताच अंमलबजावणी करणे तत्काळ सुरु करण्यात आल्याने आमदार गजबेंच्या पाठपुराव्याचे हे मोठे यश मानल्या जात असुन शेतकऱ्यांची गंभीर समस्या तत्काळ मार्गी लावल्याने आमदार गजबे यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
गडचिरोली जिल्हा उद्योग विरहित जिल्हा असुन येथील नागरिकांची उपजीविका पुर्णता शेतीवर अवलंबून आहे.यावर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी व त्यानंतर धान पिकावर झालेल्या विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड घट आल्याने येथील शेतकरी पुरते बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत. यातुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेच्या माध्यमातून रब्बी हंगामाची तयारी चालवली असली तरी खंडित वीजपुरवठा पुरक सिंचन सुविधेस मारक ठरू लागला होता.अलिकडे जिल्ह्यात कृषी पंपाचे सर्वञ जाळे पसरू लागले असले तरी महावितरण कडुन कृषी पंपांचे भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी उपलब्ध असताना पुरेशा वीजपुरवठ्या अभावी सिंचन करणे शक्य नसल्याने उभे पिक करपण्याची शक्यता निर्माण झाली होती.

दरम्यान शेतकऱ्यांना अधिकच अडचणींचा सामना करणे क्रमप्राप्त ठरून पुरते कर्जबाजारी होण्याची शक्यता बळावली होती.ही गंभीर बाब लक्षात घेता भारनियमन तत्काळ रद्द करून कृषी पंपाना सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातुन केली होती.त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शेतकऱ्यांची गंभीर समस्या लक्षात घेता महावितरणच्या अधिकाऱ्यांना तत्काळ सुरळीत विज पुरवठा करण्या संदर्भात निर्देश दिले असता ३ डिसेंबर २०२२ सकाळी ६ वाजेपासुन सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरळीत विज पुरवठा करण्याच्या अंमलबजावणीला युद्धस्तरावर सुरु करण्यात आली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मार्ग मोकळा झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आमदार गजबे यांचे आभार मानले आहेत.