चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
चामोर्शी, दि. ९/१२/२०२२
समाज कोणताही असला तरी जोपर्यंत त्या समाज संघटित होवून एक्य भाव निर्माण करून समाज क्रांती घडवून आणल्याशिवाय व मानसिक विचारधारा बदलून सामाजिक क्रांतीनेच समाजासाठी हितकारक वैचारिक क्रांती निर्माण होणार नाही त्यासाठी समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून आणणे ही काळाची गरज आहे अन्यथा बहुसंख्य असलेला हा समाज मूठभर लोकांच्या पायदळी तुडवला जाईल त्यामुळे समाज बांधवांनी सामाजिक क्रांती घडवून वैचारिक क्रांती घडवून आणावी यातच समाजाचा उद्धार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व साहित्यिक संत वाङमयाचे अभ्यासक व संजय येरणे नागभीड यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती प्रसंगी प्रतिपादन केले .
संताजी स्नेही मंडळ चामोर्शी च्या वतीने संत श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन व कीर्तन कार्यक्रम बाजार चौक नगरपंचायत चामोर्शी येथे ८ डिसेंबर रोजी आयोजित केलेला होता याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक संजय येरणे तर प्रमुख वक्ते सेवानिवृत्त प्रा. रमेश पिसे कमला नेहरू महाविद्यालय नागपूर तर कीर्तनकार म्हणून सप्त खंजिरी वादक बाल समाज प्रबोधनकार कुमारी भाविका खंडाळकर नागपूर या उपस्थित होत्या. जय लक्ष्मी महिला भजन मंडळाचे मंदाताई बारसागडे, वंदनाताई मोंगरकर ,भाग्यश्री कोवे, मेघा पत्रे, प्राची शिडाम, सुनंदाताई गोपाले, तनुजा गोपाले आणि डॉ. एस. एम. गेडाम यांनी सुगम संगीताचा कार्यक्रम व मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले. मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाप्रसंगी अनेक उपक्रम हाती घेतलेले होते यात सकाळी १० वाजता संताजी ची रथयात्रा शिवाजी चौक चामोर्शी येथून काढण्यात आली. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे यात ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदाय, भजन मंडळ ,शालेय विद्यार्थी गावातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रथयात्रेची समाप्ती कार्यक्रम स्थळी करण्यात आली. तदनंतर समाजातील गुणवंत विद्यार्थी व ज्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन आपल्या कार्याची सुरुवात केली अशा समाजातील व्यक्तींचा सत्कार हाती घेण्यात आला तसेच इयत्ता दहावी ,बारावी च्या तालुक्यातील क्रमांक धारक विद्यार्थ्यांना रवींद्र मंगरूजी बारसागडे यांचे कडून रोख ११०० रुपये व मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यात विशेष बाब म्हणजे संताजी स्नेही मंडळाने यावर्षीपासून जीवनगौरव पुरस्कार देण्याचा मानस ठेवून हा सन्मान मार्कंडा देवस्थान चे अध्यक्ष गजानन भांडेकर यांना देण्यात आला.
प्रमुख वक्ते प्राध्या . रमेश पिसे कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले की – माणूस हा अध्यात्मा शिवाय लंगडा व विज्ञानाशिवाय अधू आहे म्हणून समाज बांधवांनी स्वतःला स्पर्धेच्या युगात सिद्ध करणे म्हणजेच या महामानवांचे विचार आत्मसात करणे होय आपल्या समाजातील व्यक्ती व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची कोणतीही कमी नाही परंतु ते कस्तुरी मृगा सारखे बेकार धावपळ करत असतात हीच धावपळ चांगल्या मार्गाने केली तर निश्चितच आपला समाज एका सन्मान जनक मार्गापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही .
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामभाऊ सातपुते, नायब तहसीलदार अमोल गव्हारे ,आरटीओ केतन बारसागडे, पोलीस शिपाई कुमारी दिपाली बुरांडे ,पीएसआय सचिन वासेकर ,सिव्हिल इंजिनिअर योगेश बुरांडे, ज्युनिअर इंजिनिअर संजय बोदलकर ,एस आर पी एफ शुभम चलाख , सौरभ वासेकर , राकेश भुरसे अंकुश नैताम, आरोग्य सेवक निखिल चलाख, साहित्यिक देवाजी धोडरे आणि इयत्ता दहावीचे छकुली वासेकर, श्रुती जुवारे, हर्षल मोंगरकर बारावीचे विद्यार्थी कामिक्षा कोठारे ,सानिया वासेकर, पल्लवी वासेकर, भाग्यश्री उडान, सेविकांत दुधबावरे, सुरज वासेकर आणि बुद्धिबळपट्टू भाग्यश्री भांडेकर यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगरपंचायत उपाध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, नगरसेवक निशांत नैताम , राहुल नैताम, काजल नैताम, आशिष पिपरे, सोनाली पिपरे ,स्नेहा सातपुते यांचा सन्मान चिन्ह , शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार व बहुमान करण्यात आला. त्यानंतर संजय कुनघाडकर यांच्या ‘जयगीत ‘ काव्यसंग्रहाचे लोकार्पण करन्यात आले. या सत्कार सोहळ्यानंतर उपस्थित समाज बांधवांसाठी मार्गदर्शनपर कीर्तन कार्यक्रम कुमारी भाविका खंडाळकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर उपस्थितांना जेवणाची मेजवानी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे प्रास्ताविक राहुल नैताम तर आभार प्रदर्शन संजय कुनघाडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी स्नेही मंडळ चामोर्शीच्या सर्व महिला – पुरुष सदस्यांनी आणि नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.