आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अव्वल

श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी,न्युज जागर

देसाईगंज,दि.०४/०४/२०२३

कला व वाणिज्य शाखेत प्रथम मेरीटसह सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

नुकतीच गोंडवाना विद्यापीठाची शैक्षणिक सत्र 2021-22 ची गुणवत्ता यादी प्रकाशित झाली असून स्थानिक आदर्श महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील एकूण ६ विद्यार्थ्यांनी यात स्थान प्राप्त केला. प्रकाशित गुणवत्ता यादीत कला व वाणिज्य या दोन्ही शाखेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान प्राप्त करीत गेल्या काही वर्षांपासून गुणवत्ता यादीत अव्वल येण्याची महाविद्यालयाची परंपरा कायम राखून महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उत्तरोत्तर वाढत असल्याचे सिद्ध केले. गुणवत्ता यादीत कला शाखेतून कु. अंजली आनंदराव धाकडे तर वाणिज्य शाखेतून कु. अर्पिता पुरूषोत्तम ठोंबरे या विद्यार्थीनी अव्वल ठरले आहेत.

याशिवाय कला शाखेत अनिरुद्ध मनोहर नंदेश्वर – चवथा, वाणिज्य शाखेत: चेतन रमेश लाखडे – तृतीय, जयंत यादव भर्रे – चवथा तर विद्याधर बेनिराम कावडे यांनी सहावे स्थान प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्येही वाणिज्य शाखेत B.Com. आणि M.Com. अभ्यासक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्रथम मेरीट होते. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य, वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारे व समस्यांचे निराकरण करणारे प्राध्यापक, महाविद्यालयात पुरेशा उपलब्ध सोयी-सुविधां तसेच आपल्या परिवाराला व आई-वडीलांना दिले आहे.

आदर्श महाविद्यालयाची गोंडवाना विद्यापीठात एक सन्मानजनक ओळख आहे. महाविद्यालयाकडे विशेष तज्ञ प्राध्यापक, अनेक विभागाद्वारे आयोजित उपक्रम आणि विविध क्षेत्रातील उत्तम कार्यांसाठी सन्मानाने पाहिले जाते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सातत्याने गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी विद्यापीठ क्षेत्रात व परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे. गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापक वृद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.