चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्युज जागर
चामोर्शी,दि.०८/०४/२०२३
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुराव्या सहीत कायदेशीरपणे आक्षेप घेतल्यानंतरही .बेकायदेशीरपणे, नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज वैध ठरविले.
चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भाच्या पटलावर विकसीत बाजार समिती म्हणून उत्पन्नाच्या क्षेत्रात या बाजार समितीने आपले नाव कोरलेले आहे. अशा या बाजार समितीची नुकतीच निवडणूक (२०२३ – २०२७ करिता) लागलेली असून, निवडणूक परिपत्रक व निवडणूक कार्यक्रम २७/०३/२०२३ ला जाहीर झाल्याने उमेदवारी अर्ज व छाननी हा कार्यक्रम सुध्दा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पार पडलेला आहे. परंतु संबंधित निर्णय अधिकाऱ्यांनी शासनाच्या परिपत्रकाला केराची टोपली दाखवत नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेत, दुजाभाव करीत चुकीच्या पद्धतीने निर्णय देणाऱ्या राजु अगळे या निर्णय अधिकार् यांना तात्काळ निलंबित करुन फौजदारी गुन्हा दाखल करा. अशी मागणी पत्रकार परिषदेतून नगरसेवक आशिष भाऊ पिपरे, यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.newsjagar
सविस्तर वृत्त असे की, निवडणूक निर्णय कार्यक्रमाच्या परिपत्रकानुसार उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे भाग ५ च्या(कलम २१ च्या २ नुसार),कलम २५च्या२/२च्या अ/ब/क/ड नुसार (कलम १०/२१/२३) (कलम २५च्या ३ नुसार). मतदार व उमेदवार हे एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्रावर सूचक किंवा अनुमोदन म्हणून स्वाक्षरी करू शकत नाही.जर त्यांनी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी केल्यास ते उमेदवारी अर्ज अवैध (बाद ) घोषित करण्यात यावे. असा नियम आहे. तरी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने काहीच केलेले नाही. उलट एकतर्फी सहकार्यच करण्याचा प्रयत्न केलेला आहे.तसेच छाननी नुसार एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करणारे १३ उमेदवार नियमानुसार अवैध (बाद) झाले असते.आणि एका उमेदवारांची अडते व्यापारी मतदार संघात नोदंनी असून त्यांना उमेदवार म्हणून उभे राहता येत नाही.असे असतांना त्यांचा उमेदवारी अर्ज सेवा सहकार गटात सर्वसाधारण मतदारसंघात वैद्य ठरवण्यात आला आहे. वास्तविकता हे बेकायदेशीर आहे. तसेच काही उमेदवारांचे सातबाराचे कोणतेच आक्षेप नसताना सातबारा नाही या आधारावर ग्रामपंचायत गटातील उमेदवारचा अर्ज अवैध ठरवला व काही उमेदवारांचा सातबारा नसतानाही त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज वैद्य ठरवला. असे अनेक बेकायदेशीर व नियमबाह्य निर्णय या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने घेतलेले असून त्यामुळे हे निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून एका विशिष्ट गटासाठी काम करीत आहेत की काय अशी शंका वाटून राहिलेली आहे. एकंदरीत चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीपासून असे बोगस काम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहेत. मग यांना कुणाचा आशीर्वाद आहे हा विचार केलेलाच बरा. तसेच प्रत्येक तालुक्यातील निबंधक हा त्या तालुक्याचा निवडणूक निर्णय अधिकारी असताना येथील तालुका निबंध घोडे साहेब यांना सिरोंचा येथे कार्यभार देऊन तेथील तालुका निबंध राजु अगळे यांना येथे का आणण्यात आलेले आहेत?अशी शंका वाटून राहिलेली आहे. त्यामुळे आम्ही या दिल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयामुळे व्यतित होऊन वरिष्ठ अधिकाऱ्याकडे न्यायासाठी अपील केलेली आहे. एवढेच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहोत. तरी अशा या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून नवीन निवडणूक अधिकारी नेमून ही निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, न्यायपूर्ण व पारदर्शक पद्धतीने होईल यासाठी काही दिवसात माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी विनंती करीत आहोत. या पत्रकार परिषदेला नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,राजेश भैय्या ठाकूर, प्रमोद भगत, संजय पंदीलवार, मनोज बंडावार,त्रियोगी नारायण दुबे ,अशोक धोडरे, बंडूची चिळंगे, सुनील कन्नाके, दिनेश मिस्त्री, गोपाल साबळे, राजू धोडरे, बंडूजी नैताम, अरुणजी पिपरे,आदी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी राजु अगळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की,
यात निर्णय घेताना कोणताही दुजाभाव केलेला नाही.तसेच विशिष्ट व्यक्तीच्या सहकार्यासाठी सुद्धा काम करण्याचा प्रश्नच येत नाही.मराठीत परिपत्रक कलम २०,२ मधील इंग्रजी नोटिफिकेशन फरक असल्याने तो निर्णय घेतलेला आहे, चार गटातील मतपत्रिका वेगवेगळ्या असल्याने सूचक व अनुमोदन हे चालू शकतात, विरोधकांनी आक्षेप नोंदवला नसल्याने व बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार अडते व्यापारी गटात जी नोंदणी होती तो अर्ज सेवासहकारी गटात वैद्य ठरवण्यात आला, ग्रामपंचायत गटातील अर्ज अवैध ठरवण्यात आला त्यात तहसीलदारचे प्रमाणपत्र वा इतर कागदपत्र जोडल्या गेलेले नव्हते.वरिष्ठांनी दिलेले आदेशान्वये जिल्ह्यातील पाच ही बाजार समितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी बदलविण्यात आलेले आहेत त्यामुळे सिरोंच्याचा उल्लेख करणे योग्य नाही .एकंदरीत आपल्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे, व निरर्थक असून,आपण घेतलेले निर्णय योग्यच असून विरोधकांना वाटत असल्यास त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे न्यायासाठी दाद मागावी.