By Shri Vilas Dhore
आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रश्नाला महीला व बालविकास मंत्री यांचे सकारात्मक उत्तर.
देसाईगंज:- मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि. 3 मार्च 2023 रोजी आमदार कृष्णा गजबे यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली . सदर प्रश्नाला सकारात्मक उत्तर देताना राज्याचे महीला व बालविकास मंत्री नामदार मंगलप्रभातजी लोढा यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करणे, नादुरुस्त मोबाईल परत घेऊन नविन अद्ययावत मोबाईल उपलब्ध करणे, इंग्रजी भाषेतील पोषण ट्रॅकर ऍप मराठी भाषेत रुपांतर करणे, मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रुपांतर करुन तेथील अंगणवाडी सेविकांना नियमित अंगणवाडी सेविका एवढे मानधन देण्याचे यापूर्वीच मान्य करण्यात आले असून २ फेब्रुवारी २०२३ रोजी परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत असलेल्या पेन्शनचा एकरकमी लाभ तातडीने देण्याचे आदेश दिले जातील असे आश्वस्त केले. उपरोक्त मागण्यांसाठी अधिवेशनापूर्वी दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी आरमोरी मतदार संघातील आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची तालुक्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आमदार कृष्णा गजबे यांच्या वडसा येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांची भेट घेत निवेदन देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदीय आयुधाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित केला व त्यावर महीला व बालविकास मंत्री यांनी प्रमुख मागण्या मान्य करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बऱ्याच अंशी दिलासा मिळणार असल्याने आरमोरी मतदार संघातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे महीला व बालविकास मंत्री नामदार मंगलप्रभातजी लोढा यांचे आभार व्यक्त केले.