बापाच्या हातून दारुड्या मुलाचा खुन 

बापाच्या हातून दारुड्या मुलाचा खुन
मुलगा जागीच ठार

भेजगाव : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आईला मारहाण सुरु केली. वडील आडवे गेले असता त्यांनाही मारहाण केली. दरम्यान, वडीलाने स्वतःच्या संरक्षणाकरिता बैलबंडीच्या उभारीने मुलाच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना मूल तालुक्यातील येसगाव येथे सोमवारी (दि. २१) रात्री ८ वाजता घडली. चंद्रशेखर नागेंद्र वाढई (३५) असे मृतक मुलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी वडील नागेंद्र पांडुरंग वाढई (६५) याला अटक केली आहे.

नागेंद्र वाढई यांना तीन मुले आहे. एकाचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला. एक मुलगा कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाला तर अविवाहित मुलगा चंद्रशेखर व मृत मुलाचे दोन लहान मुल नागेंद्र सोबत राहतात. चंद्रशेखर व्यसनाधीन होता. दररोज भांडण करीत आई-वडीलांना मारझोड करायचा. सोमवारी आई भेजगाव येथे आठवडी बाजार करून परत आल्यानंतर दारूच्या नशेत अंगणात झोपलेल्या चंद्रशेखरने आईसोबत भांडण करून मारझोडही केली. घर पेटवून देण्याची धमकीही देत होता. दरम्यान वडील नागेंद्र वाढई आले. चंद्रशेखरला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने वडीलांनाही मारहाण सुरु केली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बैलबंडीच्या उभारीने चंद्रशेखरच्या डोक्यावर प्रहार करताच तो जागीच ठार झाला.
घटनेनंतर आरोपी नागेंद्र वाढई यांनीच पोलीस पाटील राजू कोसरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घटनेची दिली. पोलीस पाटील राजीव कोसरे यांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेत परिवेक्षदिन पोलीस उपाधीक्षक प्रमोद चौगुले यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील राजू कोसरे यांच्या फिर्यादीवरून पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत तपासाची चक्री फिरविली. व आरोपीला अटक केली आहे. आरोपील एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.