गडचिरोलीतील होतकरू विद्यार्थी होणार डॉक्टर: एल. एफ. यू संस्थेच्या प्रयत्नांना यश

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि 

 

गेल्या अनेक वर्षांपासून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या ‘नीट’ परीक्षेसाठी पुण्यातील लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट ही संस्था मोफत प्रशिक्षण देत आहे. त्यातही गडचिरोली व मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन वर्षापासून संस्थेच्या मार्फत ‘उलगुलान’ नावाने विशेष बॅच चालवली जाते. ज्यात यावर्षी एल. एफ. यु चे १० विद्यार्थी नीट उत्तीर्ण झाले असून लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतील.

सामाजिक, भौगोलिक व आर्थिक मागासलेपणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व इतर समाजातीलही विद्यार्थी अनेक शैक्षणिक सोयीसुविधेपासून वंचित राहतात. अश्या परिस्थितीत एल. एफ. यू च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू लागले. यावर्षीच्या उलगुलान बॅचमधील अरुण लालसू मट्टामी या विद्यार्थ्याला ४५० गुण मिळाले. यासोबतचं शंकर झडे ला ५०६, राजू दुर्गम ला ४१६, तर अबुजमाड भागातील तुरेमरका येथील राकेश पोडाळीला २८८ मार्क मिळाले आहेत.

एल.एफ. यू च्या माध्यमातून मागील सात वर्षात ७५ पेक्षा अधिक एम. बी. बी. एस, १५ पेक्षा अधिक बी.डी. एस, ३०पेक्षा अधिक बी.ए. एम. एस, २० पेक्षा अधिक बी.एच.एम.एस ला विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील नीट सारख्या परीक्षांच्या तयारीसाठी लाखो रुपये मोजावे लागतात. जे अनेक गरीब व होतकरू विध्यार्थ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अश्या गरजू विद्यार्थ्यांची निवड करुन आम्ही त्यांना मोफत निवासी प्रशिक्षण देतो जेणेकरून वैद्यकीय शिक्षणाच्या संधी पासून ते वंचित राहतात कामा नये असे एल. एफ. यू चे विश्वस्त डॉ तेजस अहिरे यांनी सांगितले.

मी भामरागड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. माझे आईवडील शेतमजूर आहेत. आज हे यश एल. एफ. यु मुळे मिळाले. मी डॉक्टर झाल्यावर माझ्या गावी येऊन रुग्णसेवा करणार आहे- अरुण मट्टामी (विद्यार्थी)