सागवानाच्या पुष्पा स्टाईल तस्करीचा डाव उधळला

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
अंकिसा (जि. गडचिरोली)नदीतून सागवान लठ्ठे बाहेर काढताना वनकर्मचारी.

साडेचार लाखांचे लठ्ठे जप्त ; झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयाची कारवाई

अंकिसा (जि. गडचिरोली), ता. २५ : ‘ पुष्पा ‘ चित्रपटात ज्याप्रकारे नदीमार्गे लाल चंदनाच्या तस्करीचे दृश्य दाखविण्यात आले . अगदी त्याप्रमाणेच सिटोंचा तालुक्यात नदीच्या प्रवाहात लाकडे सोडून ‘पुष्पा स्टाईल’ ने सागवान तस्करी सुरू आहे. मात्र झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वनकर्मचाऱ्यांनी कर्जेली नदीपात्रातून पुष्पा स्टाईलने सागवान तस्करीचा असाच एक प्रयत्न हाणून पाडत साडेचार लाखाचे सागवान लठ्ठे जप्त केले आहेत.

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या इंद्रावती नदीची उपनदी कर्जेली गावाजवळून वाहते. ही नदी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत आहे. या नदीपात्रातून सागवानाची डम्पिंग व तराफे बांधून तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली . या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने दोन पथके तयार करून कर्जेली घाटावर सापळा रचला. वनविभागाची चाहूल लागताच तस्करांनी पळ काढला. वनकर्मचाऱ्यांनी नदीपात्रातील सागवान लठ्ठे दोन दिवसांच्या परीश्रमानंतर बाहेर काढले. या कारवाईत वनविभागाने जवळपास 4 लाख 66 हजार 198 रुपयांचे 6.454 घनमीटर 37 नग सागवान लठ्ठे नदीपात्रातून जप्त केले . ही कारवाई गडचिरोली वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर, उपवनसंरक्षक पूनम पाटे, झिंगानूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. बारसागडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक तिरुपती सडमेक, महेंद्र हिचामी , विनोद गावडे , सचिन म्हस्के , अशोक गोटगोंडा, राम जोखडे, तेमासिंग गोटा, आशीष कुमरे , सुधाकर महाका, कोरेत यांच्यासह वनमजूर बक्का मडवी , नीलेश मडावी, सुधाकर गावडे , समय्या आत्राम , श्रीकांत कोंडागोर्ला , सुभाष मडावी , महेंद्र कुमरी यांनी पार पाडली.
नदीपात्रात उडी मारून तस्कर फरार
कर्जेली नदीपात्रातून सागवान तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच झिंगानूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी तस्करांना पकडण्यासाठी कर्जेली घाटावर सापळा रचला होता. मात्र वनपथकाची चाहूल लागताच तस्कर सागवान लठ्ठे नदीपात्रातच सोडून पाण्यात उडी मारून फरार झाले. वनविभागाने अज्ञात सागवान तस्करांवर वनगुन्हा दाखल केला आहे .