स्वच्छ सर्वेक्षणात गडचिरोली नगर परिषदेला पुरस्कार

.

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

गडचिरोली, ता. ४ : स्वच्छ सर्वेक्षणात गडचिरोली नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला असून राष्ट्रपती द्राेपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. award to nagar parishad gadchiroli by president of india
स्वच्छ भारत अभियान हे महात्मा गांधींच्या स्वच्छ देशाच्या संकल्पनेचा सन्मान व्हावा म्हणून सरकारने सुरू केले आहे. २ ऑक्टोबर, २०१४ रोजी प्रारंभ झालेले हे अभियान आज संपूर्ण देशात लोकांनी मनापासून स्वीकारले आहे. स्वच्छ सर्वेक्षणाला २०१६ मध्ये सुरुवात झाली तेव्हा ७३ शहरांचा त्यात समावेश होता. २०२२ मध्ये सुमारे ४३५४ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ६२ कँटोनमेंट बोडांचाही समावेश होता. केंद्र शासनाने १ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत अभियानाचा निकाल जाहीर केला. यात ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या स्वच्छ शहर नागरिकांच्या अभिप्राय श्रेणीत गडचिरोली नगर परिषदेला पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपती द्राैपदी मुर्मु, केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, केंद्रीय नगरविकास सचिव मनोज जोशी, सहसचिव रूपा मिश्रा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. गडचिरोली नगर परिषदेतर्फे हा पुरस्कार विद्यमान मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे, तत्कालीन मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी तथा प्र. आरोग्य विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार व स्थापत्य अभियंता अंकुश भालेराव यांनी स्वीकारले. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात प्र. आरोग्य विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार यांनी त्यांच्या अधिनस्त आरोग्य विभागातील कर्मचारी, नियमित व कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्यासमवेत योग्य नियोजन करुन गडचिरोली नगर परिषदेने स्वच्छतेच्या कामात अविरत मेहनत घेतली. त्यामुळे गडचिरोली नगर परिषदेने २०२२ मध्ये हरीत महा कंपोस्ट अँण्ड Open Defecation Free (ODF++) व स्वच्छ सर्वेक्षणात देखील पुरस्कार प्राप्त केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये गडचिरोली नगर परिषद देशात पश्चिम विभागातून ५१ वे तर महाराष्ट्र राज्यातुन ३० वे क्रमांक पटकावले आहे. आतापर्यंतचा हा सर्वोत्तम क्रमांक आहे.