श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे घेण्यात आलेल्या प्रबोधन पर कार्यक्रमात हरिभाऊ पाथोडे यांनी हवेतून सोन्याची चैन काढून दाखवणे, मंत्राच्या सहाय्याने होम पेटवणे, स्वर्गातून पाणी आणणे, निंबातून रक्त काढणे, अशा प्रकारचे विविध प्रात्यक्षिक करून त्याबद्दल सविस्तर माहिती दिली व त्या मागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजून उपस्थित प्रेक्षकांचे प्रबोधन केले.
“सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी मंत्रात कोणतीही शक्ती नसते हे आपल्या ओवीमधून सांगितले आहे. तरीही समाजात मंत्र-तंत्राविषयीची भीती घर करून बसली आहे. मंत्राने कोणालाही मारता येत नाही किंवा रोगही बरे करता येत नाही;” असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले.
ते सार्वजनिक शारदा मंडळ गांधी चौक सावरगाव, येथे आयोजित ‘चमत्कारा मागिल विज्ञान’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.
No one can be killed or cured by a mantra. – Haribhau Pathode
त्यांनी मंत्र-तंत्र, भूत, भानामती, स्वर्ग, नरक इत्यादी मानवी कल्पना असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमात अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले यांनी समितीची भूमिका विषद केली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक उद्धव मांढरे होते. प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.अंनिसचे नागभिड तालुका संघटक व स्वाब संस्था अध्यक्ष यशवंत कायरकर, पत्रकार अरुण बारसागडे, राजेश बारसागडे, माजी जिल्हा परिषद सदस्या नैना गेडाम, स्वाब चे सदस्य महेश बोरकर, हे प्रामुख्याने उपस्थित होते.