श्री. श्याम यादव,कोरची प्रतीनीधी ,न्यूज जागर
कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कोरची तालुक्यातील लेकुरबोडी येथे 21 तारखेच्या सकाळी जंगली हत्तींनी उभ्या पिकांची व घरांची नासधूस केली यामध्ये एक 80 वर्षिय वृद्ध महिला सनकूबाई कोलूराम नुरूटी ही गंभीर रित्या जखमी झाली असून तिला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मसेली येथून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती केले. नंतर तिला पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे रेफर केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
मागील कित्येक दिवसांपासून हे जंगली हत्ती छत्तीसगड मार्गे घेऊन कुरखेडा व गोंदिया जिल्ह्यात उत्पात मचावित असल्याचे दिसून आले होते. परंतु आज सकाळी त्यांचा कळप कोरची तालुक्यात दाखल झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
सदर घटनेची माहिती प्राप्त होताच बेळगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे हे आपल्या चमू सोबत लेकुरबोडी येथे जाऊन नागरिकांना हत्तीच्या जवळ न जाण्याचे आवाहन केले. सद्यस्थितीत नासधूस करून हत्ती परत जंगलाच्या मार्गाने निघाले असले तरी ते कधी पण परत येण्याची शक्यता नाकारता येत नसून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. कारण हत्तीच्या कळपामुळे पिकांचे सुद्धा प्रचंड नुकसान झालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 6 गरोदर माता लेकुरबोडीत असून त्यांना सुद्धा ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.