श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२४/११/२०२२२
बौध्द महासभा,रमाबाई मंडळ,सिध्दार्थ ग्रुपचे आयोजन
आक्सापूर-
गोंडपिपरी येथील पंचशील वार्डात कार्यरत असलेले भारतीय बौद्ध महासभा,रमाबाई महिला मंडळ व सिद्धार्थ युवा ग्रुपच्या वतीने शहरात बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण आणि बौद्ध धम्म परिषद नुकतीच पार पडली.हा कार्यक्रम गोंडपिपरीत सलग दोन दिवस चालला. या सोहळयाला तालुकाभरातून बौद्ध बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येनी हजेरी लावली.
गोंडपिपरी शहरातील पंचशील वार्डात तेथील बौद्धविहार परिसरात बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व डॉ.आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण आणि बौद्ध धम्मपरिषदेला भिक्खू संघांनी उपस्थिती दर्शवून आशीर्वाद दिला.समता सैनिक दलाचे पथसंचलनात यावेळी बुद्ध आणि डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमांची शहरातून भव्य मिरवणूक निघाली.पूज्य भदंत सत्यानंद महाथेरो आणि भिक्खू संघ यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.दरम्यान चिवडा येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद चांदेकर, विनोद चांदेकर आणि सुदेश चांदेकर यांच्याकडून विहारासाठी भेट दिलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण देखील त्यांच्या उपस्थितीत पार पडले.सदर कार्यक्रमादरम्यान भदंत एस बुद्धशरण थेरो,भदंत एस धम्मसेवक थेरो आदी उपस्थित होते.याचदिवशी प्रबोधन आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम सुध्दा पार पडला.यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न अशोक आंबेडकर, बुद्धमूर्ती दानकर्ते तथा गगन मलिक फाउंडेशन नागपूरचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेता गगन मलिक,प्रीतम बुलकुंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तहसीलदार के.डी.मेश्राम यांच्या अध्यक्षतेखालील सोहळ्याला कार्यकारी अभियंता रमेश शंभरकर,वैद्यमापन शास्त्र अधिकारी रूपचंद फुलझेले,प्रतिष्ठित व्यापारी हनमंतू झाडे,नगरसेवक चेतनसिंह गौर,महेंद्रसिंह चंदेल,रामचंद्र कुरवटकर,निलेश संगमवार आदी मान्यवर उपस्थित होते.रात्री स्थानिक कार्यकर्त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून त्यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी मनोरंजनाच्या माध्यमातून डॉ.आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.दुसऱ्या दिवशी महिला प्रबोधन मेळावा पार पडला.सदर मेळाव्याला गडचिरोली येथील प्रसिध्द अधिवक्ता कविता मोहरकर यांनी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम सुवर्णमाला भगत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन कवियित्री संगीता बांबोडे यांच्या हस्ते झाला.दरम्यान पार पडलेल्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय बौद्ध श्रावक संघाचे महासचिव अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम आंबेडकरी विचारवंत उद्धव नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठित व्यावसायिक प्रफुल देवगडे यांच्या हस्ते पार पडला.रात्री नागपूर येथील प्रसिद्ध कवी व गीतकार भिमदास नाईक आणि अभिनेत्या व गायक दीदी अंजली भारती यांच्या प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.दरम्यान हा कार्यक्रम भारती यांच्या दमदार सादरीकरणानंतर चांगलाच गाजला.दोन दिवसीय या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभेचे नगर अध्यक्ष राजू झाडे,रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्ष विशाखा फुललेले,सिद्धार्थ युवा ग्रुपचे अध्यक्ष सत्यशील पुणेकर यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतला.दरम्यान अनेक दात्यांमार्फत उपस्थित बांधवाकरिता यावेळी भोजनदान देखील करण्यात आले.गोडपिपरी शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचशील बुद्धविहारात गौतम बुद्ध आणि डॉ.आंबेडकर यांच्या मूर्ती व पुतळ्यांची स्थापना झाली आहे.या महत्त्वाकांक्षी कामाबद्दल वार्ड वासियांचे तालुकाभरातून कौतुक होत आहे.