श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२४/११/२०२२
देसाईगंज
शाळेतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना अंमलात आणल्या गेली. हि योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना मात्र तब्बल सहा महिण्यांपासुन मानधनच देण्यात आले नसल्यामुळे दिवाळी अंधारात गेल्याने शासनाच्या धोरणाप्रती तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यामध्ये ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, वसतीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे यांमधिल विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी १५०० रुपये या तोकड्या मानधनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान स्वयंपाकी कर्मचाऱ्यांकडेच इंधन खर्च सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली असुन याचा देखील खर्च वेळेवर दिल्या जात नाही. अलिकडे महागाईचा भडका उडाला असताना व प्रती सिलिंडर १ हजार ११८ रुपयावर येऊन ठेपला असताना स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना मात्र १५०० रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे.
स्वयंपाकी कर्मचाऱ्यांनाच स्वयंपाक तयार करण्यासोबतच मुलांना जेवण वाढणे, साफसफाई करणे आदी कामे करावे लागत आहेत. मात्र मागील सहा महिण्यांपासुन देय मानधन किमान दिवाळीच्या पर्वावर तरी मिळेल या आशेवर असलेल्या स्वयंपाकी कर्मचाऱ्यांनाच शासनाने वाऱ्यावर सोडल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी अंधारात साजरी करावी लागल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.