संविधान दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव:-साळवे

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२६/११/२०२२

बल्लारपूर

२ वर्ष ११ महिने १७ दिवसाच्या अथक परिश्रमाने तयार झालेल्या भारतीय संविधानाच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ व स्मरणार्थ भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी विधी मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटना सादर केली व भारताच्या नव्या प्रकाशमय युगाला सुरुवात झाली. भारतातील लोकांच्या भावभावना, आशा, आकांक्षा पल्लवीत झाल्या. हाच तो दिवस म्हणजे संविधान दिवस होय. असे प्रतिपादन बल्लारपूर तालुक्याचे प्रभारी तहसीलदार सतीश साळवे यांनी महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात केले. पुढे बोलतांना त्यांनी असे सांगितले की,भारतात लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे. लोकशाहीमध्ये संविधान सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण संविधानातील सर्वमान्य कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. त्यामुळे भारतीय संविधान आपले श्रेष्ठत्व दर्शविते. भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले आहे. यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक अधिकार, धार्मिक अधिकार, शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार या सर्वांचा समावेश होतो. आणि हेच अधिकार आपल्या भारतीय संविधानाची विशेषतः दर्शविते. कारण लोकशाही देशांमध्ये लोकांच्या अधिकाराचे संरक्षण करणे हाच उद्देश मूळ असतो.
भारतीय संविधानातील तरतुदीमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर जर गदा येत असेल तर असे राज्यांनी केलेले कायदे न्यायप्रक्रियेतून रद्द केले जातात. कारण भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेकडे सोपविण्यात आली आहे. त्यासाठी भारत देशात उच्च व सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आहे. सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त झाले आहे. कुणी व्यक्ती सर्वोच्च पदाने, संपत्तीने, प्रसिद्धीने, कलेने कितीही मोठा असला तरी तो व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही .

भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकास व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिक आपले मत स्वइच्छेने मांडू शकतो ,स्वइच्छेने लिखाण करू शकतो. धार्मिक स्वातंत्र्यामुळे प्रत्येक धर्मातील व्यक्तीला आपल्या धर्माची उपासना करण्याची मुभा बहाल करण्यात आली आहे. म्हणून सर्वधर्म समावेशक समाज आज आपल्या देशात टिकून आहे. आणि यामुळे भारत देश जगात या वैविध्यतेमुळे एक आपले वेगळे स्थान दर्शवितो. म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी संविधान दिवस हा आपला एक उत्सव म्हणून साजरा करावा व संविधानाप्रती आपली असलेली निष्ठा जपावी. तसेच सध्या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक असून प्रत्येकांनी त्याची माहिती घेऊन दर्शविलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून शांततामय स्थितीत निवडणूक संपन्न करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात महा.चे प्राचार्य व प्राध्यापक तसेच कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होत.