श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२ वडसा
आदर्श महाविद्यालयात संविधान दिन साजरा
“भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार देतानाच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली. भारतीय नागरीकांच्या मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ आहे.” असे मौलिक मार्गदर्शन डॉ. सुभाष उपाते यांनी केले. ते आदर्श महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रम सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांचे मार्गदर्शनात आणि वाणिज्य विभाग व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जयदेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. हितेंद्र धोटे व डॉ. श्रीराम गहाने मंचावर उपस्थित होते.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून आदर्श संविधान लिहून या देशावर अनंत उपकार केलेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भारतीय नागरिकाचे कर्तव्य म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये संविधान पोहचविण्याची जबाबदारी स्वीकारावी” असे आवाहन आहेत डॉ जयदेव देशमुख यांनी केले.
संविधान उद्देशिकेचे सर्व उपस्थिता कडून वाचन डॉ. श्रीराम गहाने यांनी करून घेतले. कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू व भूमिका डॉ हितेंद्र धोटे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय चंदनखेडे या विद्यार्थ्यांने तर पाहुणे व उपस्थितांचे आभार कु. डिंपल राऊत हिने मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.