श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज, दि.३/१२/२०२२
देसाईगंज येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा
दिवसेंदिवस दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. या वर्षी महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग ३ डिसेंबर पासून कार्यन्वित होणार आहे, महाराष्ट्र राज्य हे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य ठरले .त्यामुळे दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना लाभार्थी पर्यंत सहज व सुलभपणे पोहचवण्यासाठी या विभागाची मदत होणार आहे,असे मत देसाईगंज येथिल गटसाधन केंद्र सभागृहात समस्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली च्या वतिने आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष बंडूभाऊ कुमरे यांनी व्यक्त केले.
जागतिक दिव्यांग (अपंग) दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी, अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या उध्दारासाठी मदत मिळावी. म्हणून ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केल्या जातो.
देसाईगंज येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना राज्यउपाध्य बंडूभाऊ कुमरे होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाढई,जिल्हाउपाध्यक्ष आनंद गुरनुले, अहेरी विभाग प्रमुख काशीनाथ रुखमोडे, संचालक सुनील झाडे,महिला संचालिका शालुताई कांबळे उपस्थित होते.
यानिमित्यानं दिव्यांग व्यक्तींच्या उद्धारासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन अपंगांच्या प्रती दया न दाखवता दिव्यांग व्यक्ती देखील सामान्य व्यक्ती प्रमाणे आपले जीवन सन्मानाने जगू शकतो, हा आत्मविश्वास देवून त्यांना संधी देणे आवश्यक आहे. शासन स्तरावर विविध उपक्रम योजना राबविण्यात येते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे २०१६ मध्ये पारित झालेला दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम RPWD ACT 2016 हा कायदा भारत सरकारने पारित केला आहे,अशी माहीती यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय कसबे, विजय परशुरामकर,कानिफ धनबाते, अविराज सहारे. अजयकुमार ताटपलान, भुनेश्वर ढोमने आणि संजय तभाने यानी अथक परिश्रम घेतले.