नागपूर प्रतिनिधी ,न्यूज जागर
नागपूर,दि.०५/०१/२०२३
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील (मेडिकल) कॅन्टीनसमोर सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील महिला डॉक्टरला बाहेरच्या एका तरुणाने मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओनुसार सुरुवातीला मेडिकलच्या कॅन्टीनसमोर महिला डॉक्टर आणि मारहाण करणारा युवक दोघेही बोलत होते. बोलता- बोलता त्यांच्यात वाद झाला आणि अचानक तरुणाने महिला डॉक्टरला मारहाण सुरु केली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा मेडिकल वर्तुळात आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली. डॉक्टरला कॅज्युल्टीत हलवले. रुग्णालय प्रशासनाने पोलिसांनाही बोलवले.
मारहाण केल्यानंतर प्रियकर पसार झाला होता, मात्र पोलिसांनी काही तासांतच त्याला ताब्यात घेतले. मात्र महिला डॉक्टरने पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला. मेडिकच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला कॅफे कॅन्टीन आहे. येथे ही डॉक्टर मैत्रिणींसोबत चहा पित होती. यानंतर हा तरुण येथे आला. तेव्हा ही घटना घडली. अवघ्या पंधरा फूट अंतरावर सुरक्षारक्षक तैनात होते, मात्र ते बघ्यांच्या भूमिकेत होते. काही वेळानंतर निवासी डॉक्टरांचा जत्था येथे पोहोचला. प्रशासनाकडे तक्रार केल्यावर प्रशासनाने पोलिसांना बोलावले.
मेडिकलमध्ये दोन दिवसांच्या स्वतःच्या बाळाला पित्याकडून फरशीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल, मंगळवारी (3 जानेवारी) येथील कॅन्टीनजवळ महिला डॉक्टरला तिच्या कथित प्रियकराने मारहाण केल्याचे प्रकरण घडले.
रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात खटके उडण्याच्या, मारहाणीच्या घटना घडतात. डॉक्टरांना मारहाण होत असल्याने येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. महाराष्ट्र सुरक्षा दल, युनिटी सुरक्षा एजन्सी यांच्या प्रमुखांची बैठक घेतली. सुरक्षा व्यवस्थेत कसूर केल्यास खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा यावेळी दिला. लवकरच 140 सीसीटीव्ही कॅमेरे मेडिकलच्या आवारात लावण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
यापूर्वी मेडिकल च्या वाचनालय परिसरात बी.पी.एम टी.इंटर्न विद्यार्थिनीवर तिच्या प्रियकराने बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुदैवाने गोळी सुटली नसल्याने मोठी दुर्घटना टळली होती. या घटनेची दखल घेत मेडिकल प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलवले होते. पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. दोन दिवस मेडिकल परिसरात बंदूक शोधण्यासाठी घालवले होते. तसेच आठ दिवसांपूर्वी मेडिकलमधील प्रशासकीय अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांच्यातही सुपर स्पेशालिटीमध्ये तू.. तू मैं.. मैं झाली होती.
मेडिकलमध्ये असे अनेक नातेवाईक येतात, त्यांच्यात आपापसात मारहाण झाल्यास,त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न असतो,याला मेडिकल प्रशासन जबाबदार नाही. या घटनेतही कॅन्टीनसमोर महिला डॉक्टर आणि मारहाण करणारा युवक बोलत होते. अचानक युवकाने मारहाण केली. त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न होता. प्रशासकीय जबाबदारी म्हणून पोलिसांना बोलावले, परंतु पोलिसात तक्रार दाखल करण्यास डॉक्टरने नकार दिला- डॉ. शरद कुचेवार , वैद्यकीयअधिक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय