दारूच्या नशेत मुलाची हत्या करुन बापाचा आत्महत्येचा प्रयत्न

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज  जागर 

राजोली,दि.०९/०४/२०२३ 

दारूची नशा करते कुटूंबाची दशा. या वाक्याची प्रचिती आज राजोली परीसरात झाली. जन्मदात्या बापाने दारूच्या नशेत पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या आठ वर्षीय मुलाचा गळा आवळुन यमसदनी पाठविल्या नंतर स्वतःला संपविण्याची संतापजनक घटना तालुक्यातील राजोली येथे घडली.

नागपूर मार्गावरील मूल पासुन १७ कि.मी. अंतरावर असलेल्य राजोली येथे गणेश विठ्ठल चौधरी (३१) हा पत्नी काजल आणि मुलगा प्रियांशु सोबत राहत होता. मजुरी करून मिळणाऱ्या मोबदल्यात कुटूंब चालवतांना गणेशला दारूचे व्यसन लागले. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी गणेशने दारु पिऊन किरकोळ कारणावरून पत्नीला मारहाण केली. त्यामूळे रागाच्या भरात पत्नी काजल घर सोडुन नातेवाईका कडे निघुन गेली. त्यामूळे त्यादिवसा पासुन घरी स्वतः गणेश आणि ८ वर्षीय मुलगा प्रियांशुच होता. दरम्यान रविवार ९ एप्रिल २०२३ रोजी मुलगा प्रियांशु साखर झोपेत असतांना पहाटे ५ वाजताचे सुमारास वडील गणेशने दारुच्या नशेत मुलगा प्रियांशुचा गळा आवळुन खुन केला आणि स्वतःच्या हातावर व गळ्यावर चाकुने वार करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.newsjagar 

दारूच्या आहारी गेलेल्या गणेशने दारूच्या नशेत पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना रविवारी भल्या पहाटेच राजोली येथे वा-यासारखी पसरली. सदर घटनेची माहीती गांवातीलच गणेशच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी सदरची माहीती पोलीसांना देवुन जखमी गणेश ला उपचाराकरीता मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोहेकाँ प्रकाश खाडे आणि सहका-याने घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा करून मृतक प्रियांशुचे पार्थीव विच्छेदना करीता मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात घेवुन आले. दरम्यान उपचार घेत असलेल्या वडील गणेश विरूध्द कलम ३०२, ३०९ भादवीन्वये गुन्हा दाखल केला असुन त्याचेवर मूल येथे उपचार सुरू आहे.

पोलीसांच्या प्रारंभीक तपासात गणेशचे रोजचे भांडण आणि मारझोडीच्या प्रकारामूळे ञस्त झालेली पत्नी काजल घरून निघुन गेल्याने तिच्या रागाचा वचपा गणेशने दारूच्या नशेत एकुलत्या एक मुलावर काढुन त्याला यमसदनी पाठविल्याचे दिसुन आले. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री.सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पो.उ.नि. श्री.पंचबुध्दे करीत आहेत.