देसाईगंज ते गांधीनगर बस सेवा चालू करा – गांधीनगर परीसरातील विद्यार्थ्यांनी दिला रस्त्यावर उतरण्याचा ईशारा

श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,वडसा ,न्युज जागर 

देसाईगंज,दि. १४/०५/२०२३

तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या गांधीनगर गावातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी मोठया प्रमाणात जात असतांना राज्य परीवहन महामंडळाने गांधीनगर परीसरात बसेस सोडण्याकडे दुर्लक्ष कायम ठेवले असल्याने राज्य परीवहन महामंडळाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरण्याचा ईशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.गांधीनगर येथील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ७ ते ८ कि. मी अंतरावर जाऊन शिक्षण घ्यावे लागते. शासन- प्रशासन यांच्या नियमानुसार एसटी महामंडळ विभागाने ज्या रस्त्यावर उत्पन्न जास्त मिळते अशाच ठिकाणी एसटी बस चालू केली आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागात किती तरी वर्ग ८ ते १२ चे विद्यार्थी शिक्षणापासून वंचितच आहेत. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस पुरेशा प्रमाणात नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पायी किंवा सायकलनरे ये जा करावी लागते. त्यामुळे गांधीनगर भागात बस फेऱ्या लवकरात लवकर सुरू कराव्या अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत आहे. कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या दीड दोन वर्षापासून विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. परंतू आताही शासन-प्रशासन डोळेझाक करत आहे.बसेस वेळेवर गावात पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठविण्यास अडचण निर्माण होत आहे. काही पालक पाल्यांना शाळेत पाठवीत नाही, तर काही खासगी वाहनाने तर काही स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडतात. मात्र गरीब विद्यार्थी लालपरीविना शालेय शिक्षणापासून वंचितच आहेत.

गांधीनगर येथील विद्यार्थ्यांना २ की. मी. अंतरावर पायी जाऊन सावंगी या ठिकाणाहून बस पकडावी लागते. पण कधी कधी सावंगीवरून वडसाला जाणाऱ्या बस सुद्धा गर्दीमुळे थांबत नसल्यामुळे गांधीनगर येथील विद्यार्थ्यांना कित्येक तास बसची प्रतिक्षा करावी लागत असते. गांधीनगर आणि सावंगी या दोन गावांच्यामध्ये पहाडी भाग असल्यामुळे जंगली प्राणी सुद्धा आहेत.अशा भीतीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना सावंगी पर्यंत जीव मुठीत धरून २ कि.मी प्रवास करावा लागतो. गांधीनगर या ठिकाणी बस येते. परंतु एसटी बसची वेळ ही सकाळी ८:३० वाजताची असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते उपयोगी पडत नाही विद्यार्थ्यांचा वर्ग सकाळी ७:४५ वाजता असल्यामूळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहचू शकत नाही. जी बस ८:३० वाजता यायची. ती दिनांक १ मे २०२३ पासून बंद झाली. वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या विध्यार्थ्यांना तर सुट्टया लागल्या परंतु आजही पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा २ की. मी. अंतरावर चालत जाऊन सकाळचे  कॉलेज आणि विद्यापीठाच्या परीक्षेत उपस्थित राहावे लागत आहे.newsjagar 

विद्यार्थीना अभ्यासाचा ताण तर असतोच पण सकाळी बस कशी पकडावी आणि कॉलेजमध्ये आपण वेळेवर उपस्थित होऊ की नाही अशी चिंता असते. घरी परततांना सुध्दा उपाशी २ की. मी. अंतर कसे पार करावे याचा खूप मोठा ताण गांधीनगर येथील विद्यार्थ्यांना येतो.. यामुळे गांधीनगर गावात एसटी बस सकाळी सात वाजता सुरु करण्यात यावी या मागणीसाठी गांधीनगर परीसरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा ईशारा दिला आहे.राज्य परीवहन महामंडळाने या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी गांधीनगर परीसरातील विद्यार्थ्यांनी केली आहे.