श्री. अमित साखरे . उपसंपादक , न्यूज जागर
अहेरी (जि. गडचिरोली), ता. १९ :
प्रियकराच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचा खून मुलीने केल्याची खळबळजनक घटना अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात शुक्रवार (ता. १९) सकाळी उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव निर्मला आत्राम (वय ४९) असून आरोपी असलेल्या तिच्या मुलीचे नाव उर्मिला चंद्रकांत आत्राम (वय २२) व आरोपी प्रियकराचे नाव रूपेश येनगंधलवार (वय २२), असे आहे.
अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री पोलिस अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना आरोपी ऊर्मिला व तिचा प्रियकर रूपेश रस्त्याने ये – जा करताना दिसले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी उर्मिला व रूपेशला उर्मिलाच्या घरी नेले. घरात पोलिसांनी बघितले असताना उर्मिलाची आई निर्मला मृतावस्थेत आढळून आली. तिचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी उर्मिला व तिचा प्रियकर रूपेशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. दोघांनीही सर्व घटनाक्रम सांगितला. विशेष म्हणजे उर्मिलाचे वडील चंद्रकांत आत्राम पोलिस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी त्यांचा खून केला होता. त्यानंतर आई निर्मलानेच उर्मिलाचे पालन पोषण केले. पुढे उर्मिलाचे रूपेश येनगंधलवारसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. हे प्रेमसंबंध आई निर्मलाला मान्य नव्हते. तिने उर्मिलाला याबद्दल अनेकदा खडसावले आणि विरोध केला. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या आपल्या सख्ख्या आईचाच खून उर्मिलाने प्रियकर रूपेशच्या मदतीने केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील कारवाई अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
संधी गेली, आयुष्यही उद्ध्वस्त
आरोपी ऊर्मिला हिचे वडील चंद्रकांत आत्राम पोलिस दलात कार्यरत असताना नक्षलवाद्यांनी त्यांचा खून केला होता. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर वडिलांच्या ठिकाणी उर्मिलाला पोलिस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती. पण प्रेमात आंधळ्या झालेल्या या तरुणीने आपल्या प्रेमात आडकाठी ठरते म्हणून आपल्या जन्मदात्या आईचाच खून केल्याने अखेर तिच्यावर गजाआड होण्याची वेळ आली आहे.