तालुका प्रतिनिधी न्यूज जागर
आपल्या पतीसोबत जंगलात गुरे चारायला गेलेल्या महिलेस वाघाने ठार केल्याची घटना मंगळवार (ता. ३०) संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरीक्षेत्राअंतर्गत चुरचुरा या गावात घडली. पार्वताबाई नारायण चौधरी (वय ५५) रा. चुरचुरा, असे मृत महिलेचे नाव आहे.
पार्वताबाई ही आपल्या पतीसह गुरे चराईचे काम करत होती. मंगळवारी सकाळी दोघेही गुरे चारायला जंगलात गेले होते. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गावाकडे परत येताना पार्वताबाई मागे होती, तर तिचा पती पुढे निघून गेला होता. एवढ्यात वाघाने पार्वताबाईवर हल्ला करून तिला ठार केले. बराच वेळ होऊनही पत्नी येताना दिसत नसल्याचे बघून पती मागे गेला असता त्याला वाघाने कुणालातरी ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. त्याने आरडाओरड केल्यानंतर गावकरी धावून आले असता जंगलात पार्वताबाईचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. मडावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्वताबाईच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.
आता पर्यंत पोर्ला वनपरीक्षेत्रात वाघाने ९ जणांना ठार केले आहे. यंदाचा हा तिसरा बळी आहे. विशेष म्हणजे आरमोरी तालुक्यात आदल्या दिवशी सोमवार (ता. २९) वाघाने एका शेतकऱ्याला ठार केले होते. ही घटना ताजी असताना ऐन हरतालिकेच्या दिवशी मंगळवारी वाघाने महिलेला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित वाघाला जेरबंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे