रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी मात करून परतले डाॅ. प्रकाश आमटे

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर 

रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी मात करून 3 महिन्यांनी ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे आपल्या लाेकबिरादरी प्रकल्पात सुखरूप पोहोचले आहेत.
मंगळवार (ता. ६) संध्याकाळी ४.३० वाजता ते भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात पाेहाेचले. त्यांच्या लाेकबिरादरी आश्रमशाळेचे ६५० विद्यार्थी तसेच शिक्षक, सर्व कार्यकर्ते आतुरतेने वाट बघत होते. मागील चार दशकांहून अधिक काळ डाॅ. प्रकाश व त्यांच्या पत्नी डाॅ. मंदाकिनी आमटे यांच्यासाेबत गाेरगरीब आदिवासींची आराेग्य सेवा करत आहेत. मागील तीन महिन्यापूर्वी ते पुण्याला गेले असताना त्यांची तब्बेत बिघडली. डाॅक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना रक्ताचा कर्कराेग असल्याचे निदान झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तीन महिने कर्कराेगाशी झुंज देऊन ते बरे हाेऊन आपल्या कर्मभूमीत परतले आहेत. ते परत येताच लाेकबिरादरी प्रकल्पात आनंदाेत्सव साजरा करण्यात आला. त्यांचे प्रकल्पात आगमन झाल्याने सर्वांनाच आनंद झाला असून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे त्यांचे चाहते व त्यांच्यावर यशस्वी उपचार करणारे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डाॅक्टर्स व कर्मचारी यांचे आभार डाॅ. आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी मानले आहेत. विशेष म्हणजे डाॅ. प्रकाश आमटे यांची ही मृ़त्यूशी ही दुसरी झुंज आहे. यापूर्वी त्यांना घाेणस (रसेल्स व्हायपर) सापाने दंश केला हाेता. त्यांची प्रकृती गंभीर झाली हाेती. तेव्हाही ते जवळपास मृत्यूचे दार ठाेठावून आले हाेते.