श्री.विलास ढोरे , तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
वडसा ता. ८ : देसाईगंज (वडसा) शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उसेगाव वन कक्ष क्रमांक ९१ मध्ये केरसुणीचे गवत कापण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना गुरुवार (ता. ८) सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. प्रेमलाल तुकाराम प्रधान (वय ४५) असे मृताचे नाव असून ताे उसेगाव येथील रहिवासी आहे.
वडसा वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत प्रेमलाल प्रधान हा कक्ष क्रमांक ९१ मध्ये केरसूणी (झाडू) तयार करण्यासाठी उपयाेगात येणारे गवत आणण्यासाठी जंगलात गेला हाेता. यावेळी जंगलात असलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घालून काही अंतरापर्यंत फरफटत नेऊन ठार केले. घटनास्थळी उप वनसंरक्षक धनंजय वायभासे, सहायक वन संरक्षक मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे आणि संपूर्ण वन कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन मोका पंचनामा केला. त्यानंतर पोलिस विभागाला पाचरण करण्यात आले. मृताच्या परिवाराला अंत्यविधीकरिता वनविभागाच्या अधिकाऱ्यामार्फत वीस हजार रुपये सानुग्रह निधी उपलब्ध करून देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वडसा येथे पाठवण्यात आला. घटनेचा अधिक तपास वन कर्मचारी व पोलिस करत आहेत. वनविभागाने येथील हल्लेखाेर वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून विशेष पथकाला पाचारण केले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. रविकांत खाेब्रागडे, नेमबाज अजय मराठे यांच्या नेतृत्वात वाघ पकडण्याचे अभियान राबविण्यात येत आहे.
जनजागृती सूचनेकडे कडे दुर्लक्ष
वनविभागाने वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे प्रत्येक गावात जनजागृतीपर सूचना, वाघाचे अस्तित्व असल्याचे फलक लावले असतानाही नागरिक या जनजागृतीकडे दुर्लक्ष करत कधी जळाऊ सरपण, जंगलात मिळणारी कंदमुळे, मशरूम, केरसुणीचे गवत यासाठी जंगलात जात असल्याने अशा दुर्दैवी दुर्घटना घडत आहेत. सध्या गावात सार्वजनिक गणपती बसले असून तेथील लाऊडस्पिकरवरून वनविभागाद्वारे नियमीत मुनादी दिली जाते. पण या मुनादीकडे दुर्लक्ष करून प्रेमलाल प्रधान जंगलात गेल्याची माहिती उप वनसंरक्षक धनंजय वायभासे यांनी दिली आहे.