आता देसाईगंजपर्यत पाेहाेचले हत्ती

श्री.विलास ढोरे, वडसा तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर 

देसाईगंज (जि. गडचिराेली), ता. २३ : छत्तीसगडमधून धानोरा मार्गे कुरखेडा तालुक्यात जंगली हत्तीच्या कळपाने प्रवेश करीत धुमाकूळ माजवला होता. आता हा कळप देसाईगंज वनविभागाच्या शंकरपूर वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक 103 मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देसाईगंज तालुक्यात आधीच वाघाची दशशत असताना हत्तीच्या कळपाने प्रवेश केल्याने नवे संकट तालुकावासीयांसमोर उभे झाले आहे. हा हत्तीचा कळप रावणवाडी, टोली, बोळधा गावालगत असलेल्या जंगल परिसरात असल्याची माहिती असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे. हत्ती बघण्याकरिता नागरिक परिसरात धाव घेत असून वनविभागाच्या सुचनाकडे दुर्लक्ष केले जात आहे अशावेळी अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा देखील प्रश उपस्थित होत आहे.

हत्तींच्या कळपावर वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्र सहायक विजय कंकलवार तसेच वनरक्षक संदीप कानकाटे, सुनील कांबळे, राकेश आसलवार आदी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी जंगलामध्ये जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी धांडे यांनी केले आहे.