झाडीबोली साहित्य मंडळाच्या झाडी युवा चैतन्य पुरस्कार रंजित समर्थ व गणेश खोब्रागडे यांना प्रदान

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर 

झाडीबोली साहित्य मंडळ झाडीपट्टीचे वैशिष्ट्ये साहित्यातून समोर आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते . याचाच एक प्रेरक भाग म्हणून दरवर्षी साहित्याबरोबर सामाजिक ,सांस्कृतिक , राजकीय आणि साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या झाडीपट्टीतील कायकर्त्यांना झाडी युवा चैतन्य पुरस्कार देत असते .

दरवर्षीप्रमाणे यावर्षी झाडीबोली साहित्य मंडळाच्या निवड समितीने झाडीबोली संवर्धन आणि चळवळीसाठी भरीव योगदान देणाऱ्या मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील सरपंच रंजित समर्थ आणि सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य गणेश खोब्रागडे यांची झाडी युवा चैतन्य पुरस्कारासाठी निवड केलेली होती .

झाडी युवा चैतन्य पुरस्कार निवड समितीत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर , जिल्हा महिलाअध्यक्ष प्रा.रत्नमालाताई भोयर व जिल्हासदस्य लक्ष्मण खोब्रागडे , पंडित लोंढे , सुरेश डांगे यांनी मूल्यांकन व परिक्षणाचे काम केले .झाडीबोली वृद्धीच्या निकषानुसार निवड झालेल्या जुनासुर्ला येथील सरपंच रंजित समर्थ व ग्रामपंचायत सदस्य गणेश खोब्रागडे यांना १८सप्टेंबर २०२२ ला गोंडपीपरी येथे आयोजित कार्यक्रमात उद्घाटक संजय धोटे , माजी आमदार राजुरा , देवराव भोंगळे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष , दिलीप चौधरी, सिनेट सदस्य व मान्यवरांच्या हस्ते मानवस्त्र , सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . रंजित समर्थ हे मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील युवा सरपंच व गणेश खोब्रागडे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य असून आपल्या अभ्यासू वृत्तीने गावविकासासाठी झटून विविध योजनांची यशस्वी अमलबजावणी केली आहे . सामाजिक भान असलेले रंजित समर्थ एकलव्य मंडळाच्या माध्यमातून व गणेश खोब्रागडे प्रहार सेवाधर्मी मंचाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसांची जोपासना व संवर्धनाचे अनमोल कार्य करीत आहेत .

साहित्यावर प्रेम असलेले रंजित समर्थ व गणेश खोब्रागडे यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याकरिता २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आपल्या जुनासुर्ला या गावी आयोजित करून पंचक्रोशीत सर्वांना साहित्य विश्वाची अनुभूती दिली . कोणावर विसंबून न राहता स्वतःला झोकून देत रंजित समर्थ आणि गणेश खोब्रागडे यांनी विविध उपक्रम आणि लोकपरंपरांचे अद्भुत दर्शन साहित्य संमेलनातून अजरामर केले .राजकीय , सामाजिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले रंजित समर्थ व गणेश खोब्रागडे झाडीबोलीचे अभ्यासक असून त्यांचा साहित्य संमेलन आयोजनातील सहभाग आणि साहित्यिक प्रवास यामुळे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे .