चामोर्शी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
चामोर्शी (बातमीदार) :- युवा संकल्प संस्थेचे चामोर्शी तालुका प्रमुख सुरज नैताम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संस्था प्रमुख राहुल वैरागडे यांच्याकडे त्यांनी वैयक्तिक कारणामुळे तालुका प्रमुखपदाचा राजीनामा देऊन संस्था सोडत असल्याचे कळविले आहे.सुरज नैताम यांच्या या निर्णयानंतर चामोर्शी विविध तर्क लावले जात आहेत.
भेंडाळा येथील युवा संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वैरागडे यांचे कट्टर समर्थक असलेले सुरज नैताम गेल्या काही वर्षांपासून तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
चामोर्शी शहरात सामान्य कार्यकर्ते सर्वांशी नाळ जुळलेले पदाधिकारी म्हणून नैताम यांच्याकडे पाहिले जात होते. संस्था वाढीसाठी पक्षातून त्यांना मोठे पाठबळ मिळत असतानाच त्यांनी राजीनामा दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सुरज नैताम यांना विचारले असता, ‘आपण राजीनाम्याचे कारण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना कळविले आहे. आपल्याला याबाबत अधिक बोलायचे नाही’, असे सांगितले. मात्र, संस्थेसोबत काही कारणास्तव काम करणार नसल्याची खंत व्यक्त करत, नैताम यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आपण राजीनामा दिल्याने कोणाचेही मन दुखवणार नाही, असे मत त्यांनी संस्थेच्या वरिष्ठांना पत्राद्वारे कळविल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र या पत्राची वरिष्ठांनी कोणतीही दखल न घेतल्याने ते दुखवल्याचे सांगण्यात येते.
राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राहुल वैरागडे यांच्यासोबत जुळवून घेतात की, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.