आलेवाही येथे समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी,व चमत्कार या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम.

 

नागभीड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आलेवाही गावात सार्वजनिक शारदा महिला मंडळ च्या वतीने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे राज्य संघटक ‘हरिभाऊ पाथोडे’ यांचा ‘समाजातील अंधश्रद्धा बुवाबाजी, व चमत्कार,’ या विषयावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील मेंढा(माल) या गावात जादूटोण्याच्या संशयावरून एका वृद्धाची कुल्हाडीने तुकडे करून हत्या करण्यात आली. त्यामुळे आपल्याही गावांमध्ये अशा घटना घडू नये या उद्देशाने आलेवाही येथील सार्वजनिक शारदा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन पर प्रबोधनाचा कार्यक्रम काल रात्री घेण्यात आला.
यावेळेस मुख्य मार्गदर्शक हरिभाऊ पाथोडे यांनी “समाजात अंधश्रद्धा कशा फोफावतात व समाजातील लोकांना चमत्कार करून दाखवून स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा भास आणून समाजातील लोकांना कशाप्रकारे ढोंगी बुवा बाबा लूबाळतात , त्यापासून समाजाने सावध राहून त्यांचे आहारी जाऊ नये. यासंदर्भात मार्गदर्शन करताना… हवेतून सोन्याची चैन काढून दाखवणे, मंत्राच्या सहाय्याने होम पेटवणे, स्वर्गातून पाणी आणणे, निंबातून रक्त काढणे, अशा प्रकारचे विविध प्रात्यक्षिक करून त्याबद्दल सविस्तर माहिती दिली व त्या मागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजून उपस्थित प्रेक्षकांचे प्रबोधन केले. व “गावात कोणीही ढोंगी असा बुवा-बाबा आला तर त्याला तुम्ही प्रश्न करायला शिका. अंधश्रद्धा सोडा समाज व देश बलवान बनवा” असे सांगून मार्गदर्शन केले.

सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अनिल लोणबले चंद्रपूर जिल्हा सहसचिव अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी सुद्धा मार्गदर्शन करून जादूटोणा विरोधी कायदा याबद्दल सविस्तर माहिती दिली. व समितीची भूमिका समजावून सांगितली यात “आमचा देवाधर्माला विरोध नाही मात्र देवाधर्माच्या नावाने समाजातील दुर्बल घटकांचा आर्थिक शोषण करून लुबाडणूक करतात त्यांना आमचा विरोध आहे” असे सांगितले. तर यश कायरकर, नागभीड तालुका संघटक अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी मार्गदर्शन करताना “एकीकडे जग चंद्र आणि मंगळावर चालला मात्र दुसरीकडे आपण बुवाबाजी, भूत-प्रेत,भानामती, मंगळ-अमंगळ, यामध्ये गुंतून आहोत. गावागावात दैवी शक्ती अंगात आल्याचे भासवून ढोंगी बुवा-बाबा, स्वयंघोषित देव्या, गावातील एक दुसऱ्याचे नाव सांगून समाजात तिडा निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्या आहारी जाऊन आपल्या परिवाराचे व समाजाचे मोठे आर्थिक नुकसान करू नये.” असे सांगितले.
यावेळी आलेवाही चे पोलीस पाटील बंसोड,स्वाब चे सदस्य महेश बोरकर, सचिन रामटेके, देवेंद्र ऊईके, गावातील संपूर्ण महीला पुरुष उपस्थित होते.