प्रा. डॉ. श्रीराम गहाणे उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 

आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. श्रीराम गहाणे यांना गोंडवाना विद्यापीठाच्या अतिशय प्रतिष्ठेच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाच्या अकराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी विद्यापीठात आयोजित एका भव्य समारंभात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर गडचिरोली चिमूर लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री अशोक जी नेते गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी आणि गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते प्रा. डॉ. गहाणे यांना प्रदान करण्यात आला. प्रा. डॉक्टर श्रीराम गहाणे यांना त्यांच्या सेवाकार्यातील प्रशंसनीय कार्याच्या गौरवार्थ उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तसेच दहा हजार रुपये असे आहे.
1999 पासून देसाईगंज येथील आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इंग्रजी व इंग्रजी साहित्याचे अध्यापन करणारे प्रा. डॉ. श्रीराम गहाणे हे परिसरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक संघटनांशी जुळलेले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेशी जुळलेले असून त्यांनी अनेक विद्यापीठस्तरीय विशेष शिबीरांचे आयोजन केलेले आहे. ते सध्या गडचिरोली जिल्ह्याचे रासेयो जिल्हा समन्वयक म्हणूनही यशस्वी कार्य करीत आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेतील अतुलनीय योगदानाबद्दल याआधीच सन 2007-08 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने त्यांचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून गौरव केलेला आहे.
डॉ. गहाणे गोंडवाना विद्यापीठात अनेक महत्त्वपूर्ण प्राधिकरणांमध्ये सक्रिय राहिलेले आहेत. त्यांनी विद्या परिषदेचे सदस्य, मानव विज्ञान विद्याशाखेतील इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, कौशल्यावर आधारित अभ्यास मंडळाचे सदस्य, वार्षिक अहवाल समितीचे सदस्य, एक भारत श्रेष्ठ भारत समितीचे सदस्य, मानव विज्ञान विद्याशाखेचे सदस्य, असे अनेक पदावर कार्य करून विद्यापीठ कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. तसेच अनेक वेळा राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ते आचार्य पदवीसाठीचे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत दोन संशोधकांना आचार्य पदवी प्राप्त झाली तसेच सद्यस्थितीत पाच संशोधक संशोधन करीत आहेत. यांनी अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील परिषदा आणि चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवीत अनेक शोधनिबंध सादर केलेले असून त्यांनी संपादित केलेले दोन पुस्तके गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत.
महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता निर्धारण विभागाचे ते प्रभारी आहेत तसेच महाविद्यालय विकास समितीचे मागील दहा वर्षांपासून सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या महाविद्यालयीन कार्यामधून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. संवादात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांना पचेल आणि त्यांना रुचेल अशा विविध विद्यार्थीहिताचे उपक्रम आणि पद्धतींचा अवलंब करून अध्यापन करणे हे डॉ. गहाणे यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे. ते सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सक्रिय सहभागी असून परिसरात सामूहिक विवाह मेळाव्यांचे आयोजन तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होत असतात.
त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन गोंडवाना विद्यापीठाने डॉ. श्रीराम गहाणे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले त्यांच्या या उपलब्धीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, आमदार श्री कृष्णाभाऊ गजबे परीक्षा विभागाचे संचाल डॉ. अनिल चिताडे, संस्थाध्यक्ष श्री केवळराम घोरमोडे, उपाध्यक्ष श्री जगदीश शर्मा, सचिव श्री मोतीलाल कुकरेजा, सर्व संस्था सदस्य, प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य नामदेव कोकोडे प्राचार्य बाकरे, प्राचार्य ईश्वर मोहुरले, प्राचार्य अनिल धम्मानी, प्राचार्य शंकर कुकरेजा, प्राध्यापक नरेंद्र आरेकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, तसेच मित्र मंडळ यांच्याद्वारे डॉ. श्रीराम गहाणे यांचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.