जुन्या वादातून वृद्धावर चाकू हल्ला, इसमाचा मृत्यू -पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

जुन्या वादातून वृद्धावर चाकूने हल्ला झाला.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज (दि.१२) सकाळी गोंडपिपरी तालुक्यातील दरुर गावात घडली.भर रस्त्यावर घडलेल्या सदर घटनेने गावात सर्वत्र थरकाप उडाला आहे.

गोंडपिपरी तालुकाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दरुर येथील किसन बाघू वराते (वय ७५) याच्यावर त्यांच्या वैयक्तिक जुन्या वादावरून गावातीलच मोरेश्वर गिरमा भोयर (वय ४५) यांनी धारदार चाकूने हल्ला केला.सकाळी ९ वाजताच्या दरम्यान मृतक जागीच रक्तबंबाट झाला.तो गंभीर जखमी राहिल्यामुळे त्याला उपचारासाठी गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जीवन राजगुरू यांनी सहकऱ्यांसह घटनास्थळ गाठून फरार झालेल्या आरोपीला ताब्यात घेतले.दरम्यान किसन वराते यांना पुढील उपचारासाठी गोंडपिपरीवरून चंद्रपूरला रेफर करण्यात आले.त्याचवेळी चंद्रपूर मार्ग जाताना वाटेतच कोठारीजवळ त्यांची प्राणज्योत मावळली.दरम्यान आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर करणार असून पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.घटनेनंतर गावात प्रचंड घाबरटीचे वातावरण आहे.तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी आटोक्यात आणला.