“साहेब”आम्ही दिवाळी उघड्यावरच साजरी करायची काय?

By Arun Barsagade

अतिवृष्टीत घराची पडझड झालेल्या कुटुंबाची व्यथा
हजारो कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत

जुलै ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनें जिल्ह्यातील हजारो घरांची पडझड झाली.पडलेल्या घरांचे तालुका प्रशासनाने पंचनामे केले.मात्र दिवाळी आली तरी मदत मिळाली नसल्याने पडक्या घरातच गोरगरिबांच्या कुटुंबाना दिवाळी उघड्यावरच साजरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.अतिवृष्टीत पडलेल्या घरची मदत कधी मिळणार या प्रतीक्षेत जिल्ह्यातील हजारो कुटूंबांना आहे.
भारतीय संस्कृतीनुसार दिवाळी सण सर्वात मोठा व अत्यंत महत्वाचा आहे.या सणाच्या निमिताने घराची रंगरंगोटी,सजावट केल्या जाते.घरावर आकाश दिवे व घराच्या पुढे मातीच्या पणत्या लावल्या जातात.मात्र आता गोरगरिबांची परिस्थिती वेगळीच असून खेड्यापाड्यात अतिवृष्टीमुळे घराची पडझड झाली आहे.घराची डागडुजी करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने दिवाळी उघड्यावरच करण्याची वेळ आली आहे.
कोरोना संसर्गाच्या दोन वर्षनंतर दिवाळी आली आहे.दिवाळी सणाचा आनन्द ओसंडून वाहत आहे.सर्वांची दिवाळी साजरी होत आहे.नोकरदारांना वेळेवर वेतन व शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे पैसे जमा झाले आहेत.मात्र घरांची पडझड झालेल्यांची मदत आलीच नाही.आम्ही दिवाळीचे दिवे घरात लावयचे नाही काय?आम्ही उघड्यावरच किती दिवस काढायचे आशा वेदना उमटत आहेत.ग्रामीण भागात बहुतांश कच्चे घरे आहेत.पक्क्या घराची अनेकांना प्रतीक्षा आहे.त्यात निसर्गाने घात केल्याने पुन्हा किती दिवस कच्च्या घरात घालवायचे असा संतप्त सवाल केल्या जात आहे.जुलै ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनें थैमान घातले.जिल्ह्यातील हजारो घरे उद्धवस्त झाली आहेत.पडक्या घरात कुटुंबासह वास्तव्य सुरू आहे.प्रशासनाने तालाठ्या मार्फत पडलेल्या नुकसानग्रस्त घराचे पंचनामे केले. शासनाकडून तात्काळ मदत मिळणे अपेक्षित होते.मात्र तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटला तरीही खात्यात मदत आली नाही.त्यामुळे घराची दुरुस्ती करणे शक्य झाले नाही.अनेक कुटुंबावर दिवळीतही उघड्यावरच राहण्याची वेळ आली आहे.शासन मदतीचे आश्वासन दिले मात्र लालफितशाहीच्या उदासीनतेमुळे अजूनही मदत आलीच नाही.
अतिवृष्टीमुळे शेतीची,गोरगरीब कुटुंबच्या घराची अपरिमीत हानी झाली.नोकरदार,सावकार,व्यापारी तसेच सधन कुटुंबांनी दिवाळी साजरी करण्याकरिता वारेमाप खर्च करीत आहेत.मात्र गरबाची मुले,कुटुंब त्यांचेकडे पाहून आपल्या नशिबावर कोसत आहेत.हातात पैसे नाही,कोणतेही कामधंदे नाही,मजुरी नाही अशात दिवाळी कशी साजरी करायची.मुलेबाळे फाटके, जुने कपडे घालून इतरांच्या दिवळी च्या आतिषबाजीकडे बघत आहेत. पडझड झालेल्या कुटुंबांना उघड्यावरच दिवाळी साजरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
तात्काळ मदतीची मागणी
दिवाळीसारखा मोठा सण आला असून गोरगरिबांच्या घराची पडझड अतिवृष्टीनें झाली आहे.शासनाकडून त्वरित मदत मिळाल्यास घराची दुरुस्ती करणे शक्य होईल.अतिवृष्टीनें घरे पडलेल्या कुटुंबांना रमाई घरकुल योजना तसेच पतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी जोर धरत आहे.