कॅमेरा, घड्याळ, टॉर्च, रेडिओ पडले अडगळीत मुलेही मशगूल, मैदानी खेळापासून अलिप्त 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

मोबाइलमुळे जग जवळ आले, मात्र “नात” दुरावले

 

आधुनिक युगात मोबाइल व इंटरनेटमुळे मोठी क्रांती होऊन जग जवळ आले मात्र नाती दुरावली. याच मोबाइल संस्कृतीमुळे मात्र माणसा-माणसातील नाते दुरावत चालले आहे. मोबाइलमुळे प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत.

मोबाइलवर संभाषणाला भरपूर वेळ आहे. परंतु माणसांना एकमेकांजवळ बसून बोलायला वेळ तेवढा मिळताना दिसून येत नाही. मोबाइल, कॉम्प्युटर आणि दुरचित्रवाणीमुळे नात्यातील जिव्हाळा दुरावला असल्याचे विचित्र चित्र आज सगळीकडेच दिसत आहे. नात्यातील ओलाव्यासह या मोबाइल संस्कृतीने कॅमेरा, घड्याळ, टॉर्च, कॅलक्युलेटर, रेडीओ या वस्तूंचे महत्व देखील कमी केले आहे. आधी विविध धार्मिक सोहळे, तसेच घरगुती छोट्या-मोठ्या समारंभाचे फोटो कॅमेऱ्यात टिपून जतन करून ठेवले जायचे. परंतु आता मोबाइलच कॅमेरा झाला आहे.

त्यामुळे कॅमेरा हद्दपार झाला आहे. एकेकाळी हाताला घड्याळ बांधणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानले जायचे. आता मोबाइलमध्येच घड्याळ असल्याने हातावर घड्याळ बांधण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. आता कुणी वेळ विचारला की हाताकडे न बघता थेट खिशातून मोबाइल काढून वेळ पाहिली जाते. आता तर छोट्या प्रासंगिक कार्यक्रमाच्या पत्रिका न छापता मोबाइलवरून एसएमएस किंवा व्हॉटस अॅपद्वारे निमंत्रण पाठविले जात आहे. मोबाइलमुळे आज पत्रलेखनही कमी झाले आहे. त्यामुळे थोरा मोठ्यांना लिहायच्या पत्रातील मजकूर सुद्धा आजच्या पिढीला माहित नसल्याचे दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागात पुर्वी करमणुकीचे साधन म्हणजे रेडीओ होता. या रेडीओला पहिल्यांदा दुरचित्रवाणीने व आता मोबाइलने अडगळीत पाठविले आहे. मोबाइलमध्येच गाणे ऐकणे व चलचित्र पाहण्याची व्यवस्था असल्याने रेडीओ, टेपरेकॉर्टर आणि आता दुरचित्रवाणीकडेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. जो तो एकूणच मोबाइलमध्ये मान वाकवून असल्याने घराघरातील संवादही हरवत चालले आहे. अगदी लहानपणापासूनच मोबाइल हातात आल्याने लहान मुले मैदानी खेळांपासून दुरावली आहे. सतत मोबाइलवर राहत असल्याने ती एकलकोंडी होताना दिसून येत आहे. मानवी जीवन क्रांती करून गतिमान बनविणे आवश्यक असले तरी घरातल्या नात्यांपासून आपण दुर होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेणे अत्यंत जरूरीचे आहे. हे देखील तेवढेच सत्य आहे.