गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
एटापल्ली : तालुक्यातील कसनसुर पोलीस स्टेशन हद्दीतील झुरी येथील सहकारी नक्षल नितेश उर्फ दिलीप गज्जू हिचामी (२५) याची नक्षल्यांनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे. अशा प्रकारे नक्षल्यांकडून आपल्याच सहकाऱ्याची संशयावरून हत्या करण्याची पहिलीच व दुर्मिळ घटना आहे. दिलीप हिचामी नक्षल चळवळीत २०१२ साली सामील झाला होता, त्याची सहकारी नक्षल्यांनी ७ नोव्हेंबर सोमवारी गट्टा पोलीस स्टेशन हद्दीतील मर्दाकोई गावाजवळ बेदम मारहाण व गळा आवळून हत्या केली आहे. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी मर्दाकोईच्या नागरिकांना दिलीप रस्त्यावर मृतावस्थेत पडून आढळला.
नक्षली चळवळीतील दुर्मिळ घटना मृतदेहावर नक्षल्यांनी हस्तलिखित पत्रक टाकले असून पत्रकात माओवाद्यांचा वैरी, पोलिसांचा हस्तक नितेश उर्फ दिलीप हिचामीने कसनसुर पोलिसांकडून भरपूर पैसे घेऊन चळवळीत सामील झाल्याचे नमूद करण्यात आले. पोलिसांच्या इशाऱ्यावर नक्षली चळवळीचा वरिष्ठ नेता डिव्हिजन कमिटी सचिव शंकरराव याची ऑक्टोबर २०२२ ला धोक्याने खोटी चकमक दाखवून बंदुकीच्या गोळ्या घालून दिलीप हिचामीने हत्या केल्याचे पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळेच दिलीप हिचामीला मृत्यूची शिक्षा दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास गट्टा पोलिसांकडून केला जात आहे.