कुऱ्हाडीने वार करून वृद्ध शेतकऱ्याची हत्या

यदु चापडे धानोरा प्रतिनिधी न्यूज जागर

धानोरा – धानोरा तालुक्यातील कटझेरी पोलिस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या दराची येथे अज्ञात व्यक्तींद्वारे कुऱ्हाडीने वार करून वृद्ध शेतकऱ्याची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास ‘उघडकीस आली. या घटनेमुळे सदर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. पैकाजी पदा (60) रा. दराची असे मृत वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, पैकाजी पदा यांच्या शेतात धान कापणीचे काम सुरु आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास चारत ते शेतावर गेले होते. त्यानंतर काही वेळात त्यांचे कुटुंबीय शिदोरी घेऊन शेतात आले. मात्र पैकाजी पदा त्यांना शेतात आढळून आले नाही. दरम्यान त्यांचा नातू शेतशिवारालगत बैले असताना शेतालगतच्या जंगलात पैकाजी यांचा मृतदेह आढळून आला. प्रत्यक्ष घटनास्थळी बघितले असता पैकाजी यांचेवर अज्ञात व्यक्तीनी कुऱ्हाडाने हल्ला चढवित पाय व गिळा चिरल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेहाचे धानोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. सदर हत्या शेतीच्या वादातून झाल्याची शंका व्यक्त होत आहे. पुढील तपास धानोरा पोलिस करीत आहेत.