गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दिवाळी झाल्यावर शहरी व ग्रामीण भागात झाडीपट्टीतील नाटके, कव्वाली तसेच मीना बाजार भरणे सुरू होते. मनोरंजनाचे विविध साहित्य तसेच खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने नागरिक त्यातल्यात्यात लहान व तरुण मुले मिना बाजाराकडे आकृष्ट होतात. गडचिरोली शहरातही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अभिनव लॉनच्या परिसरात मिनाबजार सुरू झाला असुन मिनाबाजाराला परवानगी देणाऱ्या विभागाने परवानगी देण्याआधी सर्व तांत्रिक बाबींची शहानिशा केली होती का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 9:00 वाजताच्या सुमारास गडचिरोली येथे सुरू असलेल्या मिनाबाजारतील डान्सिंग झुला तुटला. ह्यावेळी त्या झुल्यावर लहान मोठे अनेक जण बसले होते. ह्या अपघातात एक युवती जखमी झाल्याची खात्रीलायक माहिती असुन सुदैवाने तिला झालेली दुखापत गंभीर नाही. मात्र हा डान्सिंग झुला तुटल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे तसेच संतापाचे असे संमिश्र वातावरण निर्माण झाले होते.
मागच्या आठवड्यात देखील जम्पिग एअर बलून फुटल्याने काही लहान मुले फुग्यावरून खाली पडली होती, परंतु त्यावेळेस काही अनर्थ घडला नव्हता. तेव्हासुद्धा राष्ट्रवादीच्या रुपेश वलके ने लोकांना मीनाबाजारात न जाण्याचे आवाहन केले होते, पण मिनाबाजारत लागोपाठ होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असुन मिना बाजार संचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मीना बाजारातील सर्व वाहने, यंत्र सामग्री यांचे मशीन फिटनेस प्रमाण पत्र योग्य आहे की नाही याची खात्री न करताच परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.