श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चंद्रपुर-यवतमाळ सिमेवरील रांगणा भुरकी येथील घटना
माजरी:- चंद्रपुर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणारी वर्धा नदीच्या पलीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेवटच्या टोक्यावर असलेल्या रांगणा भुरकी शेत शिवारात अचानक गुरुवारी सांय. ५.३० वाजताच्या दरम्यान अभय मोहन देऊळकर वय (२५) वर्ष रांगणा भुरकी येथील युवकावर वाघाने त्या युवकावर अचानक हल्ला चढवत, त्याला ठार केल्याची घटना घडली आहे.
भुरकी रांगणा येथील अभय मोहन देऊळकर हा भुरकी शेत शिवारात आपल्या शेताला पाणी देत असताना अचानक वाघाने हल्ला चढविला. अभय आणि इतर एक इसम हे दोघे जण शेतीला पाणी देत असताना अभयवर वाघाने हल्ला चढविला परंतु, दुसरा इसम त्या ठिकाणाहून मोठमोठे आवाज करीत पळ काढला. दरम्यान कुणी घटनास्थळी यायच्या अगोदरच वाघाने अभयला ओढत नेऊन काही अंतरावर त्याला ठार केले. त्याचे प्रेत सापडले असून. संपूर्ण गाव दहशतीच्या वातावरणात असून. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी होती. वृत्त लिहेपर्यंत कोणताही शासकीय विभाग घटनास्थळी दाखल झाला नव्हता.
चंद्रपुर-यवतमाळ जिल्ह्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पलीकडे यवतमाळ जिल्ह्यात सदर घटना घडल्याने वर्धा नदीच्या अलीकडच्या चंद्रपुर जिल्ह्यातील पाटाळा,राळेगाव,मनगाव, थोराना या गावातील नागरिकांना या वाघापासून धोका निर्माण झाला आहे. दोन्ही जिल्ह्याच्या मधात वर्धा नदी असून,सदर वाघाचा शिरकाव चंद्रपुर जिल्ह्यातील पाटाळा,राळेगाव,मनगाव, थोराना या गावातील कधीही होवू शकते. त्यामुळे या गावातील नागरिक दहशतीत आहे.
यापूर्वी चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी परिसरात एका वाघीणीने ऐन दिवाळीच्या दिवशी विकास कोल या खासगी कंपनीत कार्यरत कामगाराला नरभक्षी वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रात्री साढे आठ वाजताच्या सुमारास घडली.
दीपू सियाराम महतो वय ३८ वर्ष रा. न्यू हाउसिंग, वार्ड क्र.१ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतक युवकाचे नाव आहे. दीपू महतो हा काम करुन घराकडे परत येत असताना रात्री साडे आठच्या सुमारास त्याच्याच घराजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले.
सद्या माजरी-पाटाळा परिसरात वाघाची दहशत संपुष्टात येत असताना जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वाघाने परत एका इसमाची शिकार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने या वांघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.