विनयभंगाच्या आरोपीला तीन महिन्याची सक्तमजुरी

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

राजुरा तालुक्यातील भेंडवी येथील एका विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दाखल खटल्याचा निकाल लागला असून दोन आरोपींना राजुरा न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी ची शिक्षा ठोठावली आहे.

राजुरा तालुक्यातील भेंडवी येथील एक विवाहित महिला दिनांक १६ ऑक्टोंबर २०१६ ला रात्री गावाबाहेरील पडीत शेतात काड्या वेचीत असताना एकाएकी दोन युवकांनी येऊन तिचा हात पकडुन विनयभंग केला. या घटनेची तक्रार फिर्यादी विवाहित महिलेने राजुरा पोलिस ठाण्यात केली. या प्रकरणी मल्लेश शंकर संगम, वय २९ व अर्जुन दत्तू मानेपेली, वय २१ या दोन्ही आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ३५४,(अ),(१), ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. राजुरा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सविता कावळे यांनी तपास करून राजुरा न्यायालयात प्रकरण दाखल केले. आरोपी विरुद्ध सबळ साक्षीदार असल्याने न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. कोर्ट पैरवी करण्यास पोलिस हवालदार खुशाल कुमरे व विलास निस्ताने यांनी सहकार्य केले.

आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ ला राजुरा न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायाधीश श्रीमती डी.आर.भंडारी यांनी मल्लेश शंकर संगम, वय २९ व अर्जुन दत्तू मानेपेली, वय २१ या दोन्ही आरोपींना विनयभंगाच्या आरोपात प्रत्येकी तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तीन महिने साध्या शिक्षेची सजा सुनावली.