देसाईगंज बाजारपेठात भाजीपाला भरण्यासाठी प्लास्टिकचाच वापर जोरात

श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज

देसाईगंज ही गडचिरोली जिल्ह्यातील नावारूपाला आलेली बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत परिसरातील शेतकरी व नागपूर बाजारपेठेतून भाजीपाला आणला जातो. देसाईंगंज येथील काही व्यापारी हा भाजीपाला पुन्हा ग्रामीण भागात पाठवितात. मात्र यासाठी प्लास्टिक पिशव्यांचाच उपयोग केला जातो. हे प्लास्टिकसुद्धा एकल वापराचेच आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याची गरज आहे.देशात १ जुलै २०१२ पासून एकल प्लास्टिकच्या उत्पादन विक्री व वापरावर शासनाने बंदी घातली आहे. सध्या पॅकेजिंग करण्याकरिता ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाड असलेल्या व एकल वापराच्या १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाड असलेल्या प्लास्टिक व प्लास्टिकच्या वस्तू आदीवर बंदी घालण्यात आली आहे. १ जानेवारी २०२३ पासून १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाड प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. मात्र देसाईगंजात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.बाजार परिसरात अगदी लहान दुकानदारापासून तर सर्वच विक्रेते सर्रास प्लास्टिकचा वापर करीत आहेत. त्यातच अशी प्लास्टिक विक्रीची दुकाने बाजारातही उपलब्ध आहेत. देसाईगंज तालुक्यात प्लास्टिकवरचे निर्बंधच शासनाने उठविले की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आज सर्रास प्लास्टिकचा वापर होत आहे; मात्र संबंधित विभाग मूग गिळून चुपी साधल्याचे दिसून येत आहे.