बसच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी धानोरातच पडतो अंधार

धानोरा प्रतिनिधी न्यूज जागर

धानोरा,दि.१४/१२/२०२२

जिल्ह्यातील नक्सल प्रभावित असलेल्या धानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना धानोरा मधून आपल्या घरी जाण्यासाठी तासन् तास एस. टी. महामंडळाच्या बसची वाट पाहत राहावे लागत असल्यामुळे एस. टी. महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा फटका मुरुमगाव मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व प्रशासकीय कामा करीता धानोरा तालुका मुख्यालयात आलेल्या नागरिकांना बसत आहे. प्राप्त माहिती नुसार १३ डिसेंबर रोजी दुपार पासून मुरुमगावकडे जाणारी एकही बस न आल्याने शालेय विद्यार्थ्यांना सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत उपाशीपोटी धानोरा येथील बस स्टाप वरच ताटकळत राहावे लागले. धानोरा येथे प्रियदर्शनी विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल व खाजगी शाळांनमध्ये जबतलाई, येरकड, मुरुमगाव तसेच या मार्गावरील गावातील विद्यार्थी- विद्यार्थिनी दररोज शाळेत ये-जा करतात. बस च्या वेळेनुसार शाळे कडून विद्यार्थ्यांना चार वाजता सुट्टी देण्यात येते. परंतु मागील दोन दिवसांपासून चार वाजताची मुरुमगावकडे जाणारी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना धानोरा येथे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागत आहे. त्यांना घरी जाण्यास रात्रीचे आठ ते नऊ वाजत असल्यामुळे पालकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहेत. शासनातर्फे पुरवण्यात येणारी मानव विकासची बस जाते कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.