श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
भद्रावती,दि.२१/०१/२०२३
काम दर्जेदार नसल्याचा नागरिकांचा आरोप
अनेक निवेदनानंतर व एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर शहरातील भद्रनाग मंदिर ते देऊळवाडा रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली मात्र हे काम दर्जेदार नसण्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केल्यामुळे या रस्त्याच्या बांधकामा च्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम गुणवत्तेनुसार व्हावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शहरातील नागमंदिर ते देऊळवाडा या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट करण्याचे काम एक वर्षा आधीच मंजूर करण्यात आले होते. केंद्र शासनातर्फे मंजूर करण्यात आलेले हे काम आतापर्यंत पूर्णत्वास यायला पाहिजे होते, मात्र या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन एक वर्षा आधी होऊनहि ठेकेदारा तर्फे या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नव्हती. हा रस्ता शहरातील ऐतिहासिक बुद्ध लेणी कडे जात असल्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाला अधिक महत्त्व होते. याशिवाय या रस्त्यावरून शहरातील नागरिकांची व वेकोली कामगारांची सतत वर्दळ असल्यामुळे या रस्त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे होते, मात्र सदर ठेकेदाराने एक वर्षाचा कालावधी लोटून कामाला सुरुवात केली नव्हती याविषयी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे सोबत अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक निवेदने सादर केली होती .शेवटी नागरिकांचा रोष लक्षात घेता काही दिवसा अगोदर बुद्ध लेणी प्रवेशद्वारा समोरून या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली या रस्त्याचे पूर्वी डांबरीकरण होते मात्र आता या रस्त्याचे सिमेंट करण करण्यात येणार असल्यामुळे आधी या रस्त्यावरील डांबरीकरण काढून टाकायलाच पाहिजे होते ,मात्र तसे न करता या रस्त्यावरूनच पुढील काम करण्यास सुरुवात करण्यात आली .याशिवाय या रस्त्याच्या बांधकामात रेतीचा वापर न करता केवळ आणि केवळ डस्ट चा वापर करण्यात येत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या तोंडी तक्रारी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या कामाची पाहणी केली असून या कामा संदर्भात त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. या रस्त्याचे बांधकाम नियोजित दर्जा नुसार व्हावेत व नागरिकांना लवकरात लवकर रस्त्याची सुविधा मिळावी असे मागणी या भागातील नागरिक करीत आहे.