गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
सततधार पावसामुळे यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतातील अनेकांची पिके नष्ट झाले. नापिकीच्या चिंतेत सापडलेल्या गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथील एका शेतकऱ्याने घरालगत असलेल्या अंगणातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची १ सप्टेंबर रोजी सुमारास घडली. महेंद्र सदाशिव आवळे वय ३५ वर्ष रा. मुडझा असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी आत्महत्येची मुडझा गावातील ही दुसरी घटना आहे.
सदर घटनेची माहिती गडचिरोली पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. महेंद्र आवळे यांनी यावर्षी शेतातील पिक हातून गेल्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. यापुर्वी मुडझा गावातील चौधरी नामक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती . त्यानंतर पुन्हा महिनाभरानंतर आवळे या शेतकर्यांने टोकाचे पाऊले उचलले. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.