चिमूर तालुक्यातील ताज्या सीताफळाचा गोडवा सर्वदूर

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

दररोज मिळतात ताजीतवानी सीताफळे

 

सीताफळ हे एक पौष्टिक फळ असून चिमूर येथे दररोज ताज्या सीताफळाची दुकाने घेऊन शेतकरी विक्रीस बसत असून या सीताफळाचा गोडवा सातासमुद्रापार गेला आहे. कारण ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांनासुद्धा सीताफळाने भूरळ पाडली आहे.

सीताफळ हे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेतच सुरुवातीला आढळून यायची. नंतर त्याचे उत्पादन भारतातही होऊ लागले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही केली जाते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये सीताफळ, इंग्रजीमध्ये कस्टर्ड ऑपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असे म्हणतात. सीताफळात औषधी गुणधर्म असून सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मांसवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

सध्या सीताफळाचा हंगाम असून चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव, येरखेडा, खापरी येथील शेतकऱ्यांच्या नदीकाठावरील शेतात सीताफळाच्या बागा असून चिमूर येथील नवीन बसस्थानकाजवळ ताडोबाच्या दिशेने जाणाऱ्या मासळ रोड लगत ४०-५० ताज्या टवटवीत सीताफळाच्या दुकानांनी हा सीताफळ बाजार सजलेल्या असतो. तर चिमूर पिंपळनेरी उमरेड नागपूर मार्गाने जातांना सुध्दा खापरी, येरखेडा मार्गावर शेतकरी महामार्गाच्या बाजूलाच १०० रुपये २०० रुपये किंमतीचे एक सीताफळचा ढीग दिला जातो. ज्यात मोठे ५ ते ६ सीताफळे असतात. या सीताफळातून एका शेतकऱ्याला एक दीड महिन्यात ५ ते ७ हजार रुपये उत्पन्न होत असते. पण या वर्षी सततच्या व परतीच्या पावसाने सीताफळ बागा मार खाल्याने सीताफळ कमी लागले. त्यामुळे यावर्षी उतपादन निम्याहून कमी झाल्याची माहिती सीताफळे विक्री करणाऱ्या एका आजीबाईने दिली.

सिताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तमरीतीने होऊन शरीर सुदृढ बनते. स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो. आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशावेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते. कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.

सीताफळ खाताना सावधानता बाळगा

ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये. तसेच ज्यांना मधुमेह आहे, अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये. अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बैठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे. सीताफळाच्या बियांची पूड डोक्यावर लावताना ही पूड डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.